मालवणला परतीच्या पावसाचा तडाखा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी। मालवण

गेल्या महिन्याभरापासून दडी मारलेल्या पावसाने मालवणात पुन्हा जोरदार हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या या परतीच्या पावसाचा तडाखा मंगळवारी रात्री मालवण तालुक्याला बसला. आचरा, हडी व चाफेखोल येथे अनेक ठिकाणी वीज कोसळल्याने नुकसान झाले. तर काही ठिकाणी

वीज व दूरध्वनी सेवा ठप्प झाली. रात्री उशिरा वीज पुरवठा सुरू झाला. मात्र वीज खांब व वीजेच्या तारा तुटल्याने काही ठिकाणी वीज पुरवठा बुधवारीही खंडित होता. माजी पोलीस पाटील जानू सिताराम कदम यांच्या घरातील वीज मीटरसह संपूर्ण वीज कनेक्शन जळून खाक झाले. तर धर्माजी सिताराम कदम यांची विद्युत उपकरणे नादुरुस्त झाली तर घरातील भिंतींना तडे गेले. गुरुनाथ विठोबा गावकर यांच्याही वीज मीटरसह वीज कनेक्शनचे नुकसान झाले. तसेच आचरा येथेही अनेकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयाच्या मार्फत नुकसानाची पाहणी करुन अहवाल लवकरात लवकर शासनास सादर करणार आहे अशी माहिती सरपंच महेश मांजरेकर यांनी दिली.