जिवलग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अदिती सारंगधर,[email protected]

किरण… तिच्या घरासमोरील रस्त्यावरील सगळ्या भूभूंची मम्मा हीच तिची ओळख….

ऐक ना, ऐक ना. मी भूभूचं पिलू घेतलं’’ ‘‘आमच्याकडे नवं बेबी आलं’’ ‘‘अगं, पर्शियन कॅट घेतलंय’’ ‘‘लॅब वगैरे नको, चिवावा आणणार आहे’’. इतक्या उत्साहात नवीन येणाऱया पाहुण्याविषयी बोलणारे लोक. ‘‘अगं, आणला होता, पण खूप घाण व्हायला लागली घरात. खूप केस झाले गं घरभर’’ ‘‘बाप रे, नाही झेपले टँट्रम्स. कित्ती वेळा खाली न्यावं लागतं’’ ‘‘अगं, सोफा बिफा फाडायला लागला, फर्निचर चावून खराब करायला लागला’’ ‘‘माझ्या मुलांशी नाही जमलं त्याचं’’ ‘‘शी… गं, खूप रिस्पॉन्सिबिलिटी. अगदी अडकून पडायला झालं होतं’’ असंही बोलताना पाहिलेत मी.

चिडचिड होते… संताप येतो… वाईट वाटतं. वाटतं, आपलं स्वतःचं मूल असतं तर असंच वागला असतात का… देऊन टाकलं असतंत का परत बाप्पाला?

घरी आणलेले पेट्स काही आपली मानसिक भूक भागवायला नसतात फक्त, आपली एन्टरटेन्मेंट नसतात. आल्यावर आपल्या कुटुंबाचा भाग होतात. नियम वेगळे असले तरी वागणूक सहन करायला नसतात. आपल्या सोयीने पाठीवर हात फिरवला तर फक्त ओरडा खाऊन ऐकण्यापुरती नसतात, पण अशा परिच्छेदाला छेद देणारी माझी एक मैत्रीण. वेळप्रसंगी तिच्या कुत्र्यांसाठी समोरच्याशी झगडा करणारी आणि तिच्याच का, कुठल्याही रस्त्यावरच्या कुत्र्याला होणारा त्रास बघून जीव जाळणारी किरण.

‘‘चल रे अदिती, मैं क्या सेलिब्रेटी हूं क्या. तेरे इस कॉलम में मैं नहीं फिट हूं.’’ आपल्या मुलांना, पेट्सना प्रेमानं वाढवणारी, त्यांना जपणारी प्रत्येक व्यक्ती या कॉलमची सेलिब्रेटी आहे. त्यासाठी चेहऱयाला मेकअप करायची गरज नाही, हातात माईक असायची गरज नाही. गुडघ्यांना पट्टा बांधून मैदानात उतरायची गरज नाही किंवा कुठला ब्रॅण्ड एण्डॉर्स करायचीही आवश्यकता नाही.

खरं तर आम्ही या नवीन घरात राहायला आलो. ‘‘समोरच्या बंगल्यात खूप कुत्रे आहेत हं… आणि मोकळे सोडलेले असतात’’, ‘‘ती बाई एकदम डेंजर आहे’’ सांगणाऱया व्यक्तीला खरं तर वेडीच म्हणायचं होतं. ‘‘उसको ना… एक दिन सबक सिखाना पडेगा’’, ‘‘छोड देती है चार कुत्तों को, आपका तो घर का कुत्ता है… संभलकर लेकर जाईये. नहीं तो वो सामनेवाले कुत्ते अटॅक करेंगे…’’ एवढं सगळं अनेकांकडून ऐकल्यावर आधी ओळख नसतानाही माझं डोकं सटकलंच होतं तिच्यावर. त्यातून एकदोन वेळा आमच्या झोरोची खाली जायची वेळ आणि तिच्या कुत्र्यांची फिरवायची वेळ एक आल्याने आमच्या कुत्र्यांचं आणि आमचं आपापसात वाजलंही जोरदार. तेव्हापासून तिचे डॉग्ज झोरोचे दुश्मन बनले. दुश्मन गँग आणि झोरोच्या फिरवायच्या वेगळ्या वेळा फिक्स झाल्या. तरीही एकदा त्यांचं गेट उघडं असताना ऐन रंगपंचमीच्या दिवशी ते झोरोवर धावून आले. झोरो डायरेक्ट त्यांच्या प्रांतात घुसल्यावर पांगापांग झाली आणि दडून बसले, पण ज्या वेगाने आपल्या पिलांना काही होऊ नये म्हणत किरण धावत आली ना. तेव्हापासूनच मैत्री झाली आमची.

…तर या किरणकडे एक नाही, दोन नाही, 10 डॉग्ज आहेत आणि बहुतांश सगळे रस्त्यावरचेच. काहींना काही व्याधी, अपंगत्व, त्रास घेऊन जगणारे, पण त्यांचं जगणं सुसह्य करण्यात हिची खूप मेहनत आणि अपार डेडिकेशन आहे. तिच्या घरात मिलो नावाचा बिगल आहे. खरं तर माझ्या मुलाने खूप उत्साहाच्या भरात तो घेतला होता. त्याचा उत्साह संपला आणि तो म्हणाला, ‘‘आता नको मला. इग्नॉर करायला लागला त्याच्या रूममध्ये, पण मिलोचा त्रास व्हायला लागला. डोकं अस्सं फिरलं ना… म्हटलं मिलो इथेच राहणार, सगळीकडे वावरणार. तुला नसेल सांभाळायचा तरीही मी सांभाळणार. त्रास होत असेल तर तू राहू नकोस इथे. बेदम धमकीने मुलगा घाबरला, पण मिलोशी काही परत प्रेमाने बोलला नाही.

स्कुबी ही रस्त्यावरचीच आहे. आमच्या जिंजरची बेबी. जिंजर आणि पेपर सगळ्यात आधी घरी आले. आले म्हणजे रस्त्यावरच फिरायचे. जिंजर प्रेग्नंट होती. तिला खूप त्रास होत होता बहुतेक. गल्लीत जोरजोरात ओरडत असहाय्यपणे फिरत होती. मला खिडकीतून दिसत होतं वरून. न राहवून धावत खाली आले आणि बंगल्याचं गेट उघडलं. तिला आत घेतलं. अजिबात ओळख नसतानाही माझ्याजवळ येऊन तिला बरं वाटलं. चादर अंथरली. फॅन लावला खालीच. पाणी दिलं तिला. थंडगार… थोडी स्वस्थ झाली आणि जन्म दिला तिनं इटुकल्या पिटुकल्या पिलांना… जिंजर आणि पेपरची पिक्सी, डुबी, स्कुबी, साशा, बिस्कीट अशी मुलं, जी घराच्या खाली एक छानसी जाळीची रूम तयार केलीय… फॅन लावलाय आत. छान एका बाजूने कव्हर केलीय ऊन लागू नये म्हणून… खाली स्वच्छ चादर अंथरलीय. ठरावीक काळात तो पिंजरा बंद केला जातो. रात्रीच अगदी झोपायला आली की… बाकी त्यांच्या मर्जीने ती फिरतात. काही वर घरी असतात. पॅची आणि ब्राऊनी मात्र गल्लीच्या त्या टोकाशी एका बँकेचा चौथरा आहे तिथे झोपतात. मात्र त्यांची आपापसात भांडणं होताना नाही हं पाहिलंय मी अजून.

नित्यनियमाने रोज पहाटे 5.30च्या सुमारास रात्री कितीही थकले असले तरी यांना फिरायला घेऊन जाते. चार-चारचा गट असतो. दोन वेळा फेऱया. बाकी दोघं वर घरीच टॉयलेट आहे तिथे स्वच्छपणे आपला कार्यक्रम पार पाडतात. मग सगळ्यांना, दहाही जणांना मारी बिस्कीट आणि पाणी देते. कधी एखादे फळ देते. कधी अंडी देते. पण सगळ्यांना सारखंच. दुपारी त्यांचं फूड (वेटलाइट) त्यांना देते. रात्री चिकन राईस, चपात्या, दही राईस असं खातात. दिवसातून एकदा सगळ्यांना थंडगार ताक आणि रोज रोज दुपारी आईक्रीमचा एक कप प्रत्येकी. खरं तर खूप कप घेऊन येते आणि आजूबाजूच्या गल्ल्यांतही जाते. अगं, तिथल्या स्ट्रेजनाही भरवते आईक्रीम. घरी आले ना की, शांत वाटतं मला. खरं तर आमची जॉइंट फॅमिली आहे. लहान असताना ही सगळी पिलं इथे तिथे शी शू करायची. मान्य आहे, त्रास होऊच शकतो, पण माझ्यापरीने त्यांना आणि जागा क्लीन ठेवायचे. अतिच जाच व्हायला लागल्यावर सरळ केस ठोकली फॅमिलीवर. आता कळायला लागल्यावर बाहेरच जातात ना? असंच एकदा आयबी व्हॅन आली. ल्युटर करण्यासाठी गल्लीतल्या सगळ्या डॉग्जना उचलून घ्यायला लागली. मी पण गेले. डस्टेम्पर होऊन एक पिलू दगावलं ना. एक फारच लुळं पडलं. त्याला इजा झाली. थोडी काळजी घेऊन ठीक झाल्यावर मित्राच्या फार्म हाऊसवर पनवेलला पाठवलं. पण आजही त्याची काळजी घेऊन उत्तम आरोग्य, जेवणासाठी मी महिना 7 हजार रुपये पाठवते. आता मस्त आहे तो. कधी कधी लढता लढता ना थकायला व्हायचं. आयुष्यातल्या समस्या सोडवताना निराश व्हायचे, पण माझी ही गँग तयार झाल्यापासून मी इतकी स्ट्राँग झालेय की, दिवस कितीही कठीण आला आणि रात्र कितीही भयावह असली तरी मी हरत नाही. या माझ्या बाळांसाठी जगण्याची ओढ निर्माण झालीय.

मंत्र्यांपासून ते पोलीस स्टेशनपर्यंत सगळ्या फेऱया मारल्यात रस्त्यावरच्या डॉग्जना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांच्यावरचे अत्याचार थांबवण्यासाठी. माझ्या बेबीजच्या अंगावर गल्लीतली काही मुलं, माणसं दगड फेकून मारत होती गं. नको सांगूनही मज्जा म्हणून कुणी त्रास देतं का? फोन करून पोलिसांना बोलावलं रात्री 11.30 वाजता… आणि पोलीस ठाण्यात नेऊन नोंदवली तक्रार. एकटीने इतक्यांना सांभाळताना खूप खर्च पण होतो. मग दिलेल्या घराच्या खर्चाच्या बजेटमधून तजवीज करत असते, पण थोडं जरी वरखाली झालं तरी टोमणे ऐकावे लागतात घरच्यांचे. जोरदार भांडणंही होतात, पण का कसं कोण जाणे. उद्याची सोय होईल इतके पैसे येतात अचानक. या कॉलमच्या निमित्ताने एक सांगेन. माझ्यासारख्या अनेक जणी आर्थिक अडचणींवर झगडय़ाने मात करून स्ट्रेजना सांभाळताहेत. त्यांना मदत करा… आणि अशा टेन्शनमध्ये अचानक ही पिलं मस्तीच्या नादात जाऊन कुणाच्या तरी सीटवर बसतात… बाईक चालवण्याची ऍक्टिंग करतात… कधीकधी सीटची वाटही लावतात. तेव्हा दंगल करणाऱया या बाळांचं हसू येतं.

माणसांच्या या प्लॅस्टिकच्या (खोटय़ा) जंगलात कुठलाही रक्ताचा संबंध नसणाऱया या फौजेला फिरायला घेऊन बाहेर पडलं ना… की, मला जिंकल्यासारखं वाटतं. लढाई माझ्या मुलांच्या अस्तित्वाची… त्यांच्या मानानं जगण्याची…

थँक यू किरण… लव्ह यू बेबीज…!