
सामना ऑनलाईन । भोपाळ
मध्य प्रदेशातील विद्यमान 78 आमदारांना निराशाजनक कामगिरीबद्दल पुन्हा तिकीट देऊ नका, अशी सूचना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपला केली आहे. निवडणूक दीड महिन्यावर आली असताना संघाच्या या सल्ल्यामुळे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्यासह भाजप संभ्रमात पडला आहे.
मध्यप्रदेशातील राजकीय स्थितीचा आढावा घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ही सूचना केली आहे. सध्याच्या 78 आमदारांची कामगिरी चांगली नसून त्यांच्याबद्दल जनतेच्या मनात रोष आहे, असं संघाचे म्हणणं आहे. भाजपने संघाच्या या सूचनेवर अद्याप काहीही प्रतिसाद दिलेला नाही. पक्षाची निवड समिती याबाबत निर्णय घेईल, असं भाजपने स्पष्ट केले आहे. उमेदवारांचा निवड करताना विजयाची जास्तीत जास्त शक्यता हाच निकष लावला जाईल, अशी भाजपची भूमिका आहे. ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, पण सिद्ध झालेले नाहीत अशा नेत्यांना उमेदवारी दिली जाईल, असं मत भाजप प्रदेशाध्यक्ष राकेश सिंह यांनी व्यक्त केलं. विनय सहस्त्रबुद्धे हे उमेदवारांची निवड करणाऱ्या समितीचे प्रमुख आहेत.
पुढील महिन्यात मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड, छत्तीसगड आणि तेलंगणमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या या राज्यांतील निवडणुका भाजपसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळंच संघानंही यात लक्ष घातल्याचं बोललं जात आहे.




























































