
सामना प्रतिनिधी । पणजी
गोव्यातील भाजप आघाडीचे घटकपक्ष असलेल्या गोवा फॉरवर्ड आणि मगोच्या नेत्यांनी गुरुवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली असून भाजप गोव्यातील नव्या नेतृत्वाबाबत गंभीरपणे विचार करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पद सोडल्यानंतर आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, सभापती डॉ. प्रमोद सावंत किंवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष व खासदार विनय तेंडुलकर या तिघांपैकी एकाची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागू शकते. घटकपक्षांतील गोवा फॉरवर्ड व अपक्ष अशा सहा आमदारांचे नेतृत्व करणारे विजय सरदेसाई यांनी आज दिल्लीत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याशी नेतृत्वबदलाविषयी चर्चा केली. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत खासदार व प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, सभापती डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांची नावे पक्षाने विचारात घेतली आहेत. या तिघांबाबत चर्चा झाली असल्याला सरदेसाई यांनी दुजोरा दिला आहे.
गोव्यात विधानसभेची मध्यावधी निवडणूक होऊ नये यासाठी भाजपने काळजी घ्यावी. तसेच सर्वांना एकत्र घेऊन उर्वरित कार्यकाळ पूर्ण होईल असा नेता भाजपने निवडावा. असे अपक्ष आमदारांच्या गटाचे नेते विजय सरदेसाई यांनी सांगीतले आहे.
काँग्रेसचे काही आमदार गोवा फॉरवर्डच्या संपर्कात
गोव्यात भाजप आघाडीचेच सरकार राहावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसच्या अन्य काही आमदारांना भाजपात आणण्याचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत. काँग्रेसचे काही आमदार गोवा फॉरवर्डच्याही संपर्कात आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस आमदार फुटण्याचे सत्र सुरूच राहणार आहे.



























































