
सामना प्रतिनिधी । खेड
खेड तालुक्याच्या हद्दीत महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला पावसाळ्यात रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्यासाठी वेळ नसल्याने महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आदळत आपटत प्रवास करावा लागतो आहे. जगबुडी पुल ते मोरवंडे शाळा दरम्यान पावसाळ्यात पडलेले खड्डे अद्याप बुजवण्यात आले नसल्याने या परिसरात भीषण अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अरुंद व नागमोडी वळणाच्या मुंबई गोवा महामार्गावर दिवसागणिक होणाऱ्या भीषण अपघातांना आळा घालण्यासाठी मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. खेड तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या कशेडी घाट ते पर्शुराम घाट दरम्यानच्या 44 किलोमिटर रस्त्याच्या चौपदरीकरणाचा ठेका कल्याण टोलवेज इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदार कंपनीला मिळाला आहे. कामाचा ठेका घेताना केंद्र शासनाशी झालेल्या करारानुसार चौपदरीकरणाचे काम पुर्ण होईपर्यंत या 44 किलोमिटर रस्त्याची संपुर्ण जबाबदारी ही संबधित ठेकेदार कंपनीची आहे. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्याचे काम ठेकेदाराचेच पर्यायाने कल्याण टोलवेज इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीचे आहे.
गतवर्षी पावसाळ्यात रस्त्यावर पडलेले खड्ड भरण्याबाबत ठेकेदार कंपनीने आढवेढे घ्यायचा प्रयत्न केला होता. मात्र कोकणी जनतेने कंपनी व्यवस्थापनाला कोकणी हिसका दाखवताच रस्त्यावर पडलेले खड्डे भरले गेले होते. यावर्षीच्या पावसात गतवर्षीपेक्षा जास्त खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी तर वाहने हाकणेही अवघड झाले आहे. जगबुडी नदीपुलाजवळचा रस्ता तर पुर्णपणे वाहून गेला आहे. खोपीफाटा आणि भोस्ते घाट या ठिकाणीही आजही मोठमोठे खड्डे पडले आहेत. पाऊस जाताच हे खड्डे तात्काळ बुजवणे आवश्यक होते. मात्र कल्याण टोलवेज इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनी व्यवस्थपनाने खड्डे बुजविण्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले असल्याने भरणे नाका येथील जगबुडी पुल ते मोरवंडे शाळेदरम्यान अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महामार्गावर पडलेले खड्डे संबधित ठेकेदार कंपनीकडून बुजवून घेण्याची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांची आहे. कामाचा ठेका घेताना झालेल्या करारानुसार कंपनी व्यवस्थापन रस्त्याची डागडुजी करण्याकडे दुर्लक्ष करत असेल तर त्या कंपनीवर कारवाई करणे आवश्यक आहे. मात्र संबधित खात्याचे अधिकारीही खड्डे न बुजवणाऱ्या ठेकेदार कंपनीच्या विरोधात काहीही अॅक्शन घेताना दिसत नसल्याने महामार्ग खात्याचे अधिकारी खड्ड्यात एकादा अपघात होण्याची वाट तर पहात नाही ना? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण हे काही शासकिय कार्यालयांना अचानक भेटी देवून तिथल्या अनागोंदी कारभाराचा पर्दाफाश करत आहे. जिल्हाधिकाऱ्यांची काम करण्याची ही पद्धत जिल्ह्याचा अनागोंदी कारभार सुधारण्यासाठी महत्वपुर्ण ठरत असल्याने त्यांच्याकडून सर्वसामान्यांचा अपेक्षा वाढल्या आहेत. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी महामार्गावरील खड्ड्यांकडेही एकदा लक्ष घालावे आणि खड्डे न भरणाऱ्या ठेकेदार कंपन्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.


























































