मॅनहोलमध्ये उतरला म्हणून कामावरून काढले, कंत्राटी सफाई कामगारांचा आंदोलनाचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक छायाचित्र

सामना प्रतिनिधी, मुंबई

मॅनहोलमध्ये उतरल्याचा फोटो वर्तमानपत्रात छापून आला म्हणून एका सफाई कामगाराला कंत्राटदाराने कामावरून काढून टाकले आहे. पर्जन्य जलवाहिन्या विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सफाई कामगारांना अनेकदा मॅनहोलमध्ये उतरून काम करावे लागत असले तरी त्याचा थेट फोटो छापून आल्यामुळे कंत्राटदाराने स्वतःची कातडी वाचवण्यासाठी कामगारावरच कारवाईचा बडगा उचलला आहे.

पर्जन्य जलवाहिन्या विभागात सुमारे 100 कंत्राटी कामगार आहेत. या कामगारांपैकी सतीश चव्हाण हा कामगार मॅनहोलमध्ये उतरल्याचा फोटो एका इंग्रजी दैनिकात छापून आला होता. कामगारांनी कोणाच्याही सांगण्यावरून मॅनहोलमध्ये उतरू नये असा नियम असतानाही मॅनहोलमध्ये उतरल्याचे कारण देऊन या कामगाराला आर्यन पंप्स ऍण्ड इंन्व्हायरो सोलूशन प्रा. लि. या कंत्राटदाराने सफाई कामगाराला कामावरून काढून टाकले आहे. या प्रकारामुळे कंत्राटी सफाई कामगारांमध्ये संताप पसरला असून ‘महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियन’ने आज पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे.

18 कामगारांना आतापर्यंत कमी केले
कंत्राटदार आणि पालिकेचे अधिकारी मिळून या कंत्राटी कामगारांचे विविध प्रकारे शोषण करीत असतात. मात्र याविरोधात आवाज उठवला की त्या कामगारांना काहीही कारण काढून कामावरून काढून टाकण्याची कारवाई केली जाते. आतापर्यंत अशा 18 कामगारांना कमी केले असल्याचा आरोप संघटनेचे मिलिंद रानडे यांनी केला आहे.

या आहेत मागण्या-
या कामगारांना पालिकेतील कामगारांप्रमाणे किमान वेतन देणे बंधनकारक असताना ते वेतन दिले जात नाही.
कामगारांची तयारी नसतानाही त्यांना सलग तीन पाळय़ांमध्ये काम करावे लागते, मात्र त्यांना ठरल्याप्रमाणे जादा मोबदलाही दिला जात नाही.
घाणीचे काम करत असतानाही त्यांना आरोग्य विमा योजना नाही.
पीएफ व ईएसआयसीचे पैसे कापले जात असले तरी त्यांचे लाभ मिळत नाहीत.
ठेकेदार आणि प्रशासनाकडून दिल्या जाणाऱया अन्याय्य वागणुकीविरोधात येत्या 23 ऑक्टोबरपासून बेमुदत धरणे धरण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

अनेकदा मॅनहोलमध्ये उतरावेच लागते-
मॅनहोलमध्ये उतरू नये असा प्रत्यक्षात नियम असला तरी कामगारांना कधी अधिकाऱयाच्या सांगण्यावरून तर कधी कंत्राटदारांच्या सांगण्यावरून अनेकदा मॅनहोलमध्ये उतरावे लागते.कधी कधी मशीन अडकली आणि पाइप कापायची वेळ आली तर कंत्राटदार पाइप कापायला तयार नसतात. ते कामगाराला आत उतरायला सांगतात. तसेच कामगारांसाठी अत्यावश्यक असलेले गमबूट, ग्लोव्हज अशी सुरक्षेची साधनेही कोणी उच्चपदस्थ अधिकारी पाहणी करायला येणार असले तरच दिली जातात, असेही एका कामगाराने सांगितले.

summary- contract cleaners to go in strike