अलौकिक श्रीसंतदर्शन – कावडी बुवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विवेक दिगंबर वैद्य

केवळ ‘श्री दत्तप्रबोध’ हा असामान्य ग्रंथ लिहून संतपदापर्यंत पोहोचलेल्या अनंतसुत कावडी बुवा या सत्पुरुषाबद्दलची माहिती.

नगर जिह्याच्या पारनेर तालुक्यातील होंगा नोदीकिनारी वसलेल्या पिसा पिंपळगाव येथे 11 एप्रिल 1797 रोजी अनंत आणि राधाबाई पिंपळगावकर यांच्या पोटी विठ्ठलपंतांचा जन्म झाला. हेच विठ्ठलपंत पुढे जाऊन श्रीदत्त संप्रदायात ‘कावडी बुवा’ या नावाने विख्यात झाले. ऋग्वेदी आश्वलायन शाखा, भारद्वाज गोत्राच्या या देशस्थ ब्राह्मण कुटुंबात परंपरागत चालत आलेले ‘कुलकर्णी पद’ होते.

विठ्ठलपंत मातृ-पितृभक्त होते. मायपित्यावर त्यांची नितांत श्रद्धा होती. बालपणापासूनच त्यांचा ओढा परमेश्वरभक्तीकडे असल्याने दिवसाचा बराचसा काळ देवपूजा आणि ध्यानधारणा यातच व्यतीत होत असे. पुढे कळत्या वयात देवभक्तीसोबत कुलकर्णी पदाचे कामही विठ्ठलपंत तितक्याच निष्ठsने करीत असत. विठ्ठलपंतांचा पूर्ण दिवस कामकाज आणि देवार्चनेमध्ये जात असला तरीही त्यांचे मातापित्यांकडेही तेवढेच लक्ष असे. आपल्या पोटी गुणवान पुत्र निपजला आहे याचे त्यांच्या मातापित्यांना कौतुक वाटत असे.
एकदा त्या वृद्ध मातापित्यांच्या मनात सर्व तीर्थक्षेत्रे पाहावीत असा विचार आला. मात्र वृद्धापकाळामुळे हे कितपत शक्य होईल याची भीती त्यांना वाटू लागली. त्यांच्या मनातील विचार जाणून घेत विठ्ठलपंतांनी तीर्थाटनाकरिता जाण्याचे ठरविले. सोबत एक गडी, सामानाचे ओझे वाहण्यासाठी घोडा आणि एका कावडीमध्ये आई-वडिलांना बसवून विठ्ठलपंतांनी बऱयाच तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. मुलाने आपल्या मनातील सुप्त इच्छेस पूर्णत्व दिल्याचे जाणून आईवडिलांच्या चेहऱयावर अपार आनंद दिसू लागला. तेथील पंचक्रोशीतही विठ्ठलपंतांचे सर्व स्तरांतून कौतुक होऊ लागले. विठ्ठलपंत हे आधुनिक पुंडलिक आहेत असे जो तो म्हणू लागला. कावडीत बसवून आईवडिलांना तीर्थक्षेत्र दर्शनाचे पुण्य प्राप्त करवून देणारे विठ्ठलपंत तेव्हापासून सर्वत्र ‘कावडीबुवा’ या उपनावाने परिचित होऊ लागले.

काही दिवसांनी अन्य शेष राहिलेल्या तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेण्याकरिता विठ्ठलपंत नेहमीच्या जामानिम्यासह आईवडिलांसोबत निघाले. ही यात्रा सुरू असता एके दिवशी अचानकपणे विठ्ठलपंतांच्या मातोश्री राधाबाई यांना मृत्यूने गाठले. पत्नीच्या निधनामुळे आपणही संसारमुक्त झालो या भावनेतून विठ्ठलपंतांच्या वडिलांनी, अनंतरावांनी प्रयागक्षेत्री ब्रह्मवर्त येथे संन्यास ग्रहण केला आणि काही दिवसांत तेदेखील परमेश्वरचरणी लीन झाले. त्यांना जलसमाधी देण्यात आली. पित्याचे अखेरचे कार्य आटपून कावडी बुवा माघारी परतले. परतताना त्यांनी मायपित्याच्या निधनामुळे रिकाम्या झालेल्या कावडीत श्रीविठ्ठल-रखुमाईंच्या मूर्ती ठेवल्या आणि ते परतीच्या दिशेने निघाले. परतीचा प्रवासात कावडी बुवांचा मुक्काम ‘गालव’ या गावी होता. मार्गशीर्ष महिन्यातील तो दिवस श्रीदत्त जयंतीचा होता. या पुण्य दिवशी आपल्या गावात कीर्तन व्हावे असा गालवकर मंडळींचा हेतू होता. मात्र त्याकरिता कुणीही कीर्तनकार उपलब्ध होईना. या कारणाने ग्रामस्थांनी मंदिरात विसावा घेत असलेल्या कावडीबुवांच्या चेहऱयावरील तेज पाहून त्यांनाच कीर्तन करण्याची विनंती केली. कावडी बुवांनी याआधी कधीही कीर्तन केले नसल्याने त्यांच्या मनात शंका उत्पन्न झाली.

कावडी बुवा गावकऱयांशी चर्चा करीत असताना साक्षात श्री दत्तात्रेय ब्राह्मण वेष धारण करून तिथे अवतरले आणि चर्चेत सहभागी होत कावडी बुवांना म्हणाले, ‘‘तुम्ही कीर्तन आरंभ करा. जर काही चुकलेच तर मी तुम्हाला मदत करीन. काळजी करू नका.’’ आश्चर्य म्हणजे पूर्वानुभव नसतानाही कावडी बुवांनी केलेले कीर्तन फारच रंगले. ग्रामस्थांना कावडी बुवांचे कीर्तन फारच आवडले. कीर्तनाची सांगता झाल्यानंतर आश्चर्यचकित झालेल्या कावडी बुवांना पुन्हा त्या ब्राह्मणाने गाठले आणि ‘‘आपण श्री दत्तात्रेयांवर ग्रंथलेखन करावे’’ अशी सूचना केली आणि ‘‘काही अडचण असल्यास मी तुम्हाला सहाय्य करीन’’ असे आश्वासनही दिले. त्या ब्राह्मणवेषधारी श्री दत्तात्रेयांचा आशीर्वाद घेऊन कावडी बुवांनी‘ गाव सोडले आणि उज्जैन या क्षेत्री पोहोचले.

उज्जैन येथे गेल्यावर कावडी बुवांनी तिथे श्री दत्तात्रेयांच्या अवतारकार्यातील लीलाप्रसंगावर आधारित ग्रंथ लिहिण्याचा संकल्प केला आणि विस्मयकारकरीत्या त्यांच्या हातून श्री दत्तकृपेने एकामागोमाग एक अशा अर्थपूर्ण सुमधूर ओव्यांची निर्मिती होत गेली. पाहता पाहता अल्पावधीतच कावडी बुवांच्या हातून ‘श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे 40 अध्याय लिहिले गेले. ‘श्री दत्तप्रबोध’ या ग्रंथाचे लेखन करीत असतानाच कावडी बुवांच्या मनाने विरक्तीच्या दिशेने पावले उचलण्यास आरंभ केला. कसलेही पाश उरले नसल्याने त्यांनी दत्त संप्रदायाचा पुरस्कार करून आयुष्य व्यतीत करण्याचे ठरविले.

द्वारकेस जाणाऱया कावडी बुवांनी वाटेत बडोदे येथील श्रीराम मंदिरात मुक्काम केला. येथे त्यांना अनेक संतमंडळींचा सहवास लाभला. येथे प्रदीर्घ वास्तव्य झाल्यामुळे कावडी बुवांचा एव्हाना बराच शिष्यपरिवार निर्माण झाला. त्यातीलच एका शिष्याने कावडी बुवांना बुऱहाणपुरा चौखडी येथे एक भव्य श्रीराम मंदिर बांधून दिले आणि कावडी बुवांनी कायमस्वरूपी तिथेच राहावे अशी गळ घातली. भक्त मंडळींचा वाढता आग्रह पाहून कावडी बुवांनी या श्रीराम मंदिरात आपल्या कावडीमधून आणलेल्या श्री विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तींची स्थापना केली.

श्रीराम मंदिरात कायमस्वरूपी वास्तव्यास आल्यावर कावडी बुवांनी पुन्हा एकदा लेखणी सरसावली आणि ‘श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे उर्वरित 21 अध्याय पूर्ण केले. अशा रीतीने 14500 ओव्यांतून साकारलेला 61 अध्यायांचा ‘श्री दत्तप्रबोध’ हा ग्रंथराज चैत्र शुद्ध प्रतिपदा शके 1782 (सन 1860) मध्ये लिहून पूर्ण झाला. साक्षात श्री दत्तात्रेयांनी लिहवून घेतलेल्या या प्रासादिक ग्रंथाचे निर्माणकार्य पूर्ण होताच कावडी बुवांनी देह ठेवला. ‘श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे लेखन हेच कावडी बुवांच्या अवतारकार्याचे सर्वात मोठे वैशिष्टय़ आहे. श्री दत्त संप्रदायामध्ये प्रातःस्मरणीय व पूजनीय असलेल्या ‘श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाच्या वाचनाने सर्व मनोकामना पूर्ण होतात असा समस्त दत्तभक्तांचा अनुभव आहे.

बडोदा येथे कावडी बुवा यांचे प्रख्यात श्रीराम मंदिर आहे. आषाढ शु. अष्टमीस कावडी बुवांच्या पुण्यतिथी औचित्याने सप्ताह संपन्न होतो. या सप्ताहादरम्यान श्री दत्तप्रबोध पारायण, कीर्तन-प्रवचने-भजन-पूजन, वेदपठणादी शास्त्रसंमत कार्ये संपन्न होतात. त्यासोबतच पौर्णिमा, गोपाळकाला आणि चैत्र मासामध्ये येथे श्रीराम जन्मोत्सव साजरा केला जातो. अनेक अभंग व श्लोकांची निर्मिती करणारे अनंतसुत कावडी बुवा आज अजरामर ठरले आहेत ते श्री दत्त संप्रदायातील महत्त्वपूर्ण अशा ‘श्री दत्तप्रबोध’ या अप्रतिम ग्रंथाच्या निर्मितीमुळे.
– [email protected]