
सामना प्रतिनिधी। रत्नागिरी
रत्नागिरी येथील कवायत मैदानावर रविवारी २१ ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृतीदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस दलातील ज्या पोलीस अधिकारी व कर्मचायांना कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य प्राप्त झाले, त्यांच्या स्मृतीस आदरांजली वाहण्यात आली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दिनांक 01/09/2017 ते 31/08/2018 या कालावधीत देशात एकूण 419 पोलीस अधिकारी व जवान यांनी कर्तव्य बजावत असताना शहीद झाले. यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील 03 पोलीस जवानांना वीरमरण आले आहे.
या कार्यक्रमास पोलीस उपअधीक्षक (गृह) महादेव वावळे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्रीम. ढाकणे यांचेसह पोलीस अधिकारी व कर्मचारी, नागरीक, वकील,सिक्रेट हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलचे एन.एन.सी.चे विदयार्थी उपस्थित होते.
२१ ऑक्टोबर १९५९ या दिवशी लडाखमधील हॉट स्प्रिंग या ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दलातील 10 शूर शिपायांवर चीनच्या सशस्त्र सैनिकांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात पोलिसांनी जीवाची बाजी लावून चीनच्या सैनिकांनी चोख प्रत्युत्तर देत सरहद्दीचे रक्षण केले. चीनच्या सैनिकांशी लढताना केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी प्राणाची आहुती दिली होती. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ 21 ऑक्टोबर हा दिवस हिंदुस्थानात पोलीस स्मृतीदिन म्हणून ओळखला जातो.































































