शिंदेच्या पाठीवर हात ठेऊन पालकमंत्र्यांचा पक्षांतर्गत विरोधकांना इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

योगेश पाटील । हिंगोली

जिल्ह्यात दुष्काळ पाहणी दौऱ्यावर दोन दिवसासाठी आलेल्या पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी भाजपचे युवा नेते रामरतन शिंदे यांच्या पाठीवर हात ठेऊन पक्षांतर्गत विरोधकांना सूचक इशारा दिल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. दुष्काळ पाहणी दौऱ्यात भाजपामध्ये गटबाजीचा दुष्काळ निर्माण झाल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.

हिंगोलीचे पालकमंत्री दिलीप कांबळे हे 19 ते 20 ऑक्टोबर रोजी दुष्काळ पाहणी दौऱ्यासाठी जिल्ह्यात दाखल झाले होते. तब्बल बाराच्यावर गावांना भेटी देऊन पालकमंत्र्यांनी पाहणी केली. आश्वासन देऊन अंमलबजावणी न करणारे पालकमंत्री अशी दिलीप कांबळे यांची ओळख हिंगोली जिल्ह्यात बनली असून आढावा बैठक व त्यानंतर दिलेले आश्वासन प्रत्यक्षात पूर्ण झाल्याशिवाय पालकमंत्र्यांच्या या दौऱ्याचे नेमके फलीत काय हे समोर येणार नाही.

पालकमंत्र्यासमवेत जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, आमदार, जि.प. सदस्य, भाजपा कार्यकर्ते असा लवाजमा या दौऱ्यामध्ये सहभागी होता. मात्र, सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या एका फोटोमुळे या दौऱ्याची नव्याने चर्चा सुरु झाली आहे. स्वत: इच्छा प्रदर्शीत न करता वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातुन भाजपचे युवा नेते रामरतन शिंदे यांनी हिंगोली विधानसभा मतदार संघात धुमधडाका चालविला आहे. हिंगोलीचे भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्यासोबत सुप्त संघर्ष या माध्यमातुन सुरू आहे. पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी आमदार तानाजी मुटकुळे यांना न दुखावता रामरतन शिंदे यांच्या मागे पाठबळ उभे केले आहे. शिंदेंच्या मागणीनुसार वेगवेगळ्या विकासकामांसाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. दरम्यान, दुष्काळ पाहणी दौऱ्यात पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी रामरतन शिंदे यांच्या पाठीवर हात ठेवुन शेतशिवार फेरी केली. कांबळे यांना गुडघ्याचा त्रास असल्याने शेतशिवारातील ओबडधोबड जमिनीवर चालतांना आधाराची गरज वाटली असेल मात्र आधारासाठी नेमका रामरतन शिंदे यांचाच खांदा कांबळे यांना जवळचा वाटल्याने याबाबत राजकीय चर्चा रंगली आहे. पालकमंत्र्यांनी पाठीवर हात दिल्यामुळे न बोलता ध्येयाकडे वाटचाल करणाऱ्या रामरतन शिंदे यांना अप्रत्यक्ष बळ मिळाले असुन पक्षांतर्गत विरोधकांनाही सूचक इशारा दिल्याचे मानले जाते.