
सामना प्रतिनिधी । बुलढाणा
महाराष्ट्र शासन अन्न व नागरी पुरवठा विभागाने लाभार्थ्यांच्या पसंतीनुसार थेट लाभ हस्तांतरण रोख अनुदाना देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी सोमवारी राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक महासंघाच्या वतीने जिल्ह्यातील तेरा तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करुन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
जिल्हाध्यक्ष राजेश अंबुसकर यांच्या नेतृत्वात बुलढाणा येथे माणिकराव सावळे, चिखली येथे नरेश राजपूत, मेहकर येथे डी.आर. वानखेडे, सिंदखेडराजा येथे उद्धव नागरे, देऊळगावराजा येथे निरंजन जिंतुरकर, लोणार येथे भगवान कोकाटे, मोताळा येथे विश्वास पाटील, खामगाव येथे रवी महाले, शेगाव येथे भानुदास भांगे, संग्रामपूर येथे बाळासाहेब महाले, नांदुरा येथे समाधान पाटील व जळगावजामोद येथे राजु पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन संपन्न झाले. यावेळी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सर्व स्वस्त धान्य दुकानदार आंदोलनात सहभागी होते. आता तरी शासनाने निर्णय बदलला अन्यथा १५ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वस्त धान्य दुकानदारांचा मोर्चा नेण्यात येणार असल्याची माहिती राजेश अंबुसकर यांनी दिली.


































































