
सामना प्रतिनिधी । मुंबई
फेसबुकवरील वाक्युद्धातून भाजपच्या दोघा कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्याची तलवारीने वार करून हत्या केल्याची घटना रविवारी रात्री घाटकोपरच्या असल्फा व्हिलेज परिसरात घडली. रात्री दीडच्या सुमारास एकमेकांच्या दुचाकी धडकल्याचे निमित्त झाले आणि दोघाजणांनी फेसबुक वादाची खुन्नस काढली, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
मनोज दुबे (45) हा काँग्रेसचा कार्यकर्ता होता. जीतेंद्र मिश्रा आणि उमेश ठाकूर या दोघांनी त्याची हत्या केली. हे दोघेही भाजपचे कार्यकर्ते असून ही राजकीय हत्या असल्याचा आरोप दुबेच्या कुटुंबीयांनी केला आहे, तर 21 तारखेला काँग्रेस आमदार नसीम खान यांचा वाढदिवस होता. त्या दिवशी दुबे याने नसीम खान यांच्या कामाची माहिती फेसबुकवर पोस्ट केली होती. त्यावर भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या. त्यामुळे दुबे आणि त्यांच्यात जोरदार वाक्युद्ध रंगले होते. हा वाद नंतर सामोपचाराने मिटविण्यातदेखील आला. दरम्यान रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास मनोज दुबे याच्या विरोधात एका भाजप कार्यकर्त्याने घाटकोपर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर रात्री दीडच्या सुमारास असल्फा व्हिलेज येथील माहेश्वरी महादेव मंदिरासमोर मनोज दुबे आणि आरोपी हे दुचाकीवरून एकमेकांच्या समोरासमोर आले. तेव्हा गाडय़ा एकमेकांना घासल्याने पुन्हा त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे संतापलेल्या आरोपींनी फेसबुकवरील वादाची खुन्नस काढत तलवारीने दुबेवर सपासप वार केले. त्यातच दुबेचा मृत्यू झाल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी उमेश ठाकूर आणि जीतेंद्र मिश्रा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू असल्याचे साकीनाका पोलिसांनी सांगितले.
फेसबुकच्या वादातून काढली खुन्नस
मनोज दुबे याने काही पदावरदेखील काम केले होते. तो सध्या काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून कार्यरत होता, परंतु दुबेविरोधात हत्येचा प्रयत्न करणे व मारहाणीत गुन्हा दाखल असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
दुबेची हत्या राजकीय हेतूने प्रेरित आहे. त्याची हत्या दोघांनी नाही तर सहाजणांनी मिळून केली आहे, परंतु एफआयआरमध्ये केवळ दोघांची नावे लिहिण्यात आली आहेत. सर्व आरोपींना पकडा अशी मागणी आम्ही केली आहे, पण खरे आरोपी पकडले नाहीत तर सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊ असा इशारा आमदार नसीम खान यांनी दिला आहे.
























































