
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
वन डे वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱया देवधर ट्रॉफी या क्रिकेट स्पर्धेला मंगळवारी सुरुवात झाली. हिंदुस्थान ‘ब’ संघाने हिंदुस्थान ‘अ’ संघावर 43 धावांनी विजय मिळवत स्पर्धेत विजयी सलामी दिली. हनुमा विहारी, मनोज तिवारी यांची अर्धशतके… मयांक अग्रवाल, श्रेयस अय्यर यांच्या उपयुक्त खेळी… अन् मयांक मार्कंडे व शाहबाज नदीम यांची प्रभावी गोलंदाजी हिंदुस्थान ‘ब’ संघाच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरल्या. दिनेश कार्तिकच्या 99 धावा व रविचंद्रन अश्विनची अष्टपैलू चमक हिंदुस्थान ‘अ’ संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.
हिंदुस्थान ‘ब’ संघाकडून मिळालेल्या 262 धावांचा पाठलाग करणाऱया हिंदुस्थान ‘अ’ संघाला 218 धावांपर्यंतच मजल मारता आली. दिनेश कार्तिकने 114 चेंडूंत 1 षटकार व 11 चौकारांसह 99 धावांची खेळी करीत संघाच्या विजयासाठी प्रयत्न केले. तसेच रविचंद्रन अश्विनने 54 धावांची खेळी करीत त्याला उत्तम साथ दिली, पण दोघांनाही इतर कोणाची साथ मिळाली नाही. शाहबाज नदीमने 32 धावा देत 3 आणि मयांक मार्कंडेने 48 धावा देत 4 फलंदाज बाद केले. वरुण ऍरोनने 2 फलंदाज बाद केले.
दरम्यान, याआधी हिंदुस्थान ‘ब’ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद सिराजने ऋतुराज गायकवाडला 2 धावांवर बाद केले, पण त्यानंतर मयांक अग्रवालने 46 धावांची, श्रेयस अय्यरने 41 धावांची, हनुमा विहारीने नाबाद 87 धावांची आणि मनोज तिवारीने 52 धावांची खेळी केली आणि हिंदुस्थान ‘ब’ संघाला 261 धावांपर्यंत नेले. रविचंद्रन अश्विनने 39 धावा देत 2 फलंदाज बाद केले.






























































