
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
विंडीजविरुद्ध कसोटी मालिकेत निर्भेळ यश मिळवल्यानंतर विराट सेनेने पाच एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकत विंडीजवर दबाव निर्माण केला. पहिल्या सामन्यात विराटने 140 धावा चोपत सामनावीरचा पुरस्कार पटकावला होता. जागतिक क्रमवारीमध्ये कसोटी आणि एक दिवसीय क्रिकेट प्रकारामध्ये ‘नंबर एक’वर विराजमान असणारा हिंदुस्थानचा कर्णधार विराटने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडला आहे.
LIVE #INDvWI 2nd ODI : टीम इंडियाची प्रथम फलंदाजी
वेस्ट विंडीजविरुद्ध एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम विराट कोहलीने आपल्या नावावर केला आहे. विराटने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. पाच एक दिवसीय सामन्यांची मालिका सुरू होण्यापूर्वी विराटला सचिनच्या पुढे जाण्यासाठी 186 धावांची आवश्यकता होती. विराटने पहिल्या सामन्यात 140 धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात 46 वी धाव काढताच विराटने सचिनचा विक्रम मोडला.
बांगलादेशच्या ‘या’ खेळाडूला वाटतं की विराट कोहली मानव नाही तर …
सचिनने वेस्ट इंडिजविरुद्ध 39 एक दिवसीय सामन्यात 52.73 च्या सरासरीने 1573 धावा ठोकल्या आहेत. यात त्याच्या 4 शतकांचा आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. तर कोहलीने 29* एक दिवसीय सामन्यात 60.30 च्या दमदार सरासरीने 1574* धावा चोपल्या आहेत. यात त्याच्या 5 शतकांचा आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे.
या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर ‘द वॉल’ राहुल द्रविड आहे. द्रविडने 40 सामन्यात 42.12 च्या सरासरीने 1348 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 3 शतकांचा आणि 8 अर्धशतकांचा समावेश आहे. चौथ्या स्थानावर सौरव गांगुली असून त्याच्या नावावर 27 सामन्यात 47.58 च्या सरासरीने 1142 धावांची नोंद आहे. यात त्याच्या 11 अर्धशतकांचा समावेश आहे. विंडीजविरुद्ध फक्त या चार फलंदाजांनी एक दिवसीय क्रिकेटमध्ये 1000 पेक्षा जास्त धावा चोपलेल्या आहेत.





























































