सामना प्रतिनिधी । पुणे
पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या तरुणीला तिच्या प्रियकराने उत्तमनगर येथील एका खोलीमध्ये वर्षभर डांबून ठेवून गुंगीचे इंजेक्शन देऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तरुणासह त्याच्या बहिणीवर उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
श्रीकांत राजू शिंदे (वय २८, रा. लोणावळा) याच्यासह एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २० वर्षीय पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. पीडित तरुणी मूळची भुसावळची असून, ती पुण्यात शिक्षणासाठी आली होती. त्यावेळी तिची शिंदेशी ओळख झाली. काही दिवसांनी या दोघांचे प्रेम जुळले. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले. शिवणे परिसरात भाड्याने फ्लॅट घेऊन ते सोबत राहत होते. काही दिवसांनी तिला शिंदेचे लग्न झाले असल्याचे समजले. त्यामुळे तिने लग्नास नकार दिला. त्यामुळे त्याने तिला फ्लॅटमध्ये डांबून ठेवले. तिचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली. तिला वर्षभर फ्लॅटमध्ये डांबून ठेवले. यादरम्यान तिला गुंगीचे इंजेक्शन देऊन तिच्यावर अत्याचार केले. अखेर या तरुणीने स्वत:ची सुटका करून घेतली. तिने भुसावळला घरी जाऊन आई-वडिलांना हा प्रकार सांगितला. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) सतीश डहाळे करीत आहेत.





























































