
सामना क्रिडा प्रतिनिधी । पुणे
पाकिस्तानचा क्रिकेटपटू जावेद मियाँदाद हा प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंचे लक्ष विचलित करण्यासाठी काही ना काही बोलत राहायचा. ही त्याची सवयच होती. आमच्या काळातील तो मवाली खेळाडू होता, असा स्ट्रेट ड्राइव्ह लगावलाय लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी. अथश्री फाऊंडेशनच्या वतीने शुक्रवारी सुनील गावसकरांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सुनंदन लेले यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
माझ्या कारकीर्दीतील अखेरचा सामना मी पाकिस्तानविरुद्ध खेळलो. या सामन्यात आम्हाला पराभवाला सामोरे जावे लागले. याचे प्रचंड दुःख झाले. मात्र त्यानंतर मी जावेद मियाँदादला भेटलो तेव्हा त्याने माझी माफीही मागितली, असे सुनील गावसकर यावेळी म्हणाले. यावेळी हिंदुस्थान-पाकिस्तान लढतींतील किस्से सुनील गावसकरांनी सांगितले.





























































