समजून घ्या व्हेगन डाएट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. अविनाश भोंडवे

व्हेगन पद्धती ही केवळ आहारपद्धती नसून एक अहिंसावादी जीवनपद्धती आहे. गेल्या दशकात या पद्धतीचा अंगीकार जगभरात विशेषतः अमेरिकेत जास्त होऊ लागला आहे. मात्र त्याला एक नवा ‘डाएट फंडा’ असे स्वरूप आले आहे. त्यामुळेच वजन कमी करण्यासाठी ज्या फॅड डाएट्सचा सुळसुळाट झाला आहे, त्यातच याची गणना होऊ लागली आहे याचे वैषम्य वाटते.

आहार हा उत्तम आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाचा मूलभूत घटक असतो. शरीराला लागणारी ऊर्जा आहारातून मिळते. शाकाहारी आणि मांसाहारी असे आहाराचे दोन मुख्य प्रकार दिसून येतात. निसर्गातदेखील काही प्राणी हे फक्त गवत आणि झाडपाला खाणारे शुद्ध शाकाहारी, तर सजीव प्राण्यांना मारून त्यांच्यावर ताव मारणारे काही मांसाहारी जनावरे असतात. मानवामध्ये मात्र आपल्या इच्छेने, धार्मिक संकल्पनांमुळे, कौटुंबिक आचारसंहितेमुळे, पचनाच्या तक्रारींमुळे, वैद्यकीय कारणांमुळे अनेकजण शाकाहारी बनतात, तर काही मांसाहारी. यामध्ये शाकाहारी व्यक्ती मांसाहार पूर्णपणे टाळत असते. मात्र मांसाहारी व्यक्तीच्या आहारात माफक प्रमाणात का होईना शाकाहारी पदार्थ असतातच.

जगात निर्माण होणारे वनस्पतीजन्य पदार्थ खाणाऱया व्यक्तींना सर्वसाधारणपणे शाकाहारी म्हटले जाते. जागतिक स्तरावर ‘व्हेजिटेरियन सोसायटी’ ही शाकाहाराचा प्रसार होण्यासाठी कार्यरत आहे. या संस्थेने जगातील शाकाहारी व्यक्तींचे चार प्रकारात वर्गीकरण केले आहे.

– लॅक्टो-ओव्हो-व्हेजिटेरियन ः वनस्पतीजन्य आहारासमवेत दूध आणि अंडी खाणाऱया व्यक्ती या वर्गात येतात.
-लॅक्टो व्हेजिटेरियन- या व्यक्ती दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करतात, पण अंडी खात नाहीत.
– ओव्हो व्हेजिटेरियन – या व्यक्ती अंडय़ांना शाकाहारी मानून ती खातात, मात्र दूध शाकाहारी नाही असे मानून ते वर्ज्य ठेवतात.
– व्हेगन- या व्यक्ती दूध, दुग्धजन्य पदार्थ, अंडी आणि इतर सर्व प्राणीजन्य पदार्थ वर्ज्य करतात. व्हेगन आहारामध्ये पुन्हा काही उपप्रकार आहेत.
– फक्त वनस्पतीजन्य पदार्थ- यात फळे, भाज्या, तृणधान्ये, शेंगा, वनस्पतीच्या बिया आणि जाड कवचाचे पदार्थ (नट्स) हे केवळ वनस्पतीजन्य पदार्थ वापरले जातात.
– उकडून किंवा कच्चे खाणे- वरील वनस्पतीजन्य पदार्थ कच्चे किंवा 48 अंश तापमानापेक्षा कमी उष्णतेने उकडून खाणे

– 80/10/10- यात 80 टक्के फळे आणि भाज्या वापरतात तर तेलबिया 10 टक्के आणि शेंगा, डाळी, तृणधान्ये 10 टक्के वापरतात.
– स्टार्च डाएट- यात फळे न खाता, त्याऐवजी बटाटे, भात, कंदमुळे, भात आणि मका शिजवून खाल्ले जातात.
– मिश्र पद्धत- यात सायंकाळी 4 वाजेपर्यंत कच्ची फळे, भाज्या आणि रात्रीच्या जेवणात उकडलेले बटाटे, भात, मका खाल्ला जातो.
– जंकफूड व्हेगन- यात वनस्पतीजन्य फळे आणि भाज्या न वापरता प्रक्रियायुक्त चीज, फ्राईज, चिप्स, फळांचे डबाबंद रस वापरले जातात.

व्हेगन आहार म्हणजे प्राणिजन्य अन्नपदार्थांचा संपूर्ण त्याग करणे. या आहारपद्धतीत दूध, तूप, मध हे पदार्थ मिळवताना हिंसा होते, त्यामुळे ते खाऊ नयेत असे बिंबवले जाते.

दुधाला पर्याय म्हणून सोयाबीन, नारळ आणि बदामाचे दूध या पद्धतीत घेतले जाते. लोण्याऐवजी व्हेगन मेयोनेज, तर चीज आणि पनीरऐवजी टोफू वापरले जाते. आहारात फळांचे रस जास्त प्रमाणात घेतले जातात. प्रथिनांसाठी कडधान्ये, डाळी, सोयाबीन व त्याचे पदार्थ वापरतात. स्निग्ध पदार्थांसाठी असंपृक्त वनस्पतीजन्य तेल मर्यादित प्रमाणात समाविष्ट करतात. अ, ब, क जीवनसत्वांची पूर्तता फळे, भाज्या आणि हातसडीचे तांदूळ, होल ग्रेन गव्हाच्या पोळ्या किंवा ब्रेडमधून होतो. तर ड जीवनसत्वा करिता सूर्यप्रकाश असे सांगितले जाते.

या आहारातून जे पोषक घटक मिळत नाहीत, त्यांची पूर्तता करण्यासाठी ‘सप्लिमेंट्स’ची गोळ्या औषधे वापरावी लागतात. या आहाराला सर्वत्र खूप प्रसिद्धी मिळून जगातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर या पद्धतीला अनुसरू लागले आहेत. जागतिक स्तरावर असंख्य शहरात ‘व्हेगन सोसायटी’ निर्माण असून त्यामध्ये केवळ मांसाहारच नव्हे तर दूध पिण्यावरदेखील टीका करण्यात येते.

व्हेगन आहाराचे फायदे
– व्हेगन आहारामध्ये भाज्या-फळांच्या स्वरूपात तंतुमय पदार्थ (फायबर), ऑण्टिऑक्सिडंट्स मोठय़ा प्रमाणात असतात. त्यामुळे बॅड कोलेस्टेरॉल म्हणून गणल्या जाणाऱया एल.डी.एल.चे प्रमाण 21 टक्क्यांनी कमी होते. याचा परिणाम हृदयविकाराची शक्यता कमी होण्यात होते.
– उच्च रक्तदाब नियंत्रणात येतो.
– मधुमेह सहजी ताब्यात राहतो आणि त्याचे दुष्परिणाम टळतात.
– तेल, तूप कमी गेल्याने वजन नियंत्रणात येते आणि लठ्ठपणा कमी होऊ लागतो.

तोटे
यामध्ये सुरवातीला वजन कमी होते, पण वनस्पतीजन्य आहार घेता घेता अति शर्करायुक्त गोडाचे पदार्थ, तेलकट आणि तळीव पदार्थ जास्त खाण्याकडे कल वाढतो आणि उलट वजन वाढ होऊ लागते. या आहारात अत्यावश्यक अमिनो ऑसिड्स, कॅल्शियम, ऑण्टिऑक्सिडन्टस्, फोलेट्स, लोह, ब-12 आणि ड-3 हे घटक खूपच कमीच मिळतात. परिणामतः या व्यक्ती पांढुरक्या पडतात, स्नायू दुबळे पडून, हाडे कमकुवत होऊन कृश दिसू लागतात. उतारवयात हाडे त्यांच्या ठिसूळपणामुळे किरकोळ धक्क्यानेसुध्दा सहजपणे मोडतात. या व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती तुलनेने घटते.

आपल्या शरीराच्या वाढीसाठी प्रथिनांची गरज असते. ही प्रथिने 22 प्रकारच्या अमिनो ऑसिडपासून बनलेली असतात. त्यातील नऊ अत्यावश्यक असतात. यांना ‘इसेन्शियल अमिनो ऑसिडस्’ म्हणतात. ही मानवी शरीरात तयार होत नाहीत, त्यामुळे ती आहारातूनच मिळवावी लागतात. ती फक्त प्राणिजन्य पदार्थांपासूनच मिळतात. वनस्पतीजन्य पदार्थात यांचा पूर्ण अभाव असतो. त्यामुळे शाकाहाराला थोडय़ा मर्यादा येतात. आपल्या शरीरातील मज्जासंस्थेच्या कार्यासाठी आणि बऱयाच चयापचय क्रियांसाठी बी-12 या जीवनसत्वाची गरज भासते. शाकाहारी पदार्थात बी-12 चा अभाव असतो. त्यामुळे अशक्तपणा, हातापायांना मुंग्या येणे, स्नायूचे दुखणे असे त्रास जाणवू शकतात.

व्हेगन आहार आणि महात्मा गांधी
व्हेगन ही संकल्पना 1944 साली इंग्लंडमध्ये उदयाला आली. याचे प्रणेते डोनाल्ड वॉटसन यांच्यावर गांधींच्या अहिंसावादी तत्त्वज्ञानाचा प्रभाव होता. 1920 साली महात्मा गांधींनी इंग्लंडमध्ये ‘व्हेजिटेरियन सोसायटी’समोर एक व्याख्यान दिले. त्यात त्यांनी ‘नैतिकता आणि अहिंसा पायाभूत मानून शाकाहाराचा पुरस्कार करायला हवा’ असे आवाहन केले होते. यामुळे प्रभावित झालेल्या वॉटसन यांनी ‘व्हेगन डाएट’ ही संकल्पना निर्माण केली. 1994 साली ‘जागतिक व्हेगन संस्था’ इंग्लंडमध्येच स्थापन झाली. जगभरात या आहारपद्धतीचा प्रसार व्हावा, प्राणी जगताचे संरक्षण व्हावे आणि मानवी आरोग्याचे संवर्धन व्हावे या उद्देशाने 1994पासून दरवर्षी 1 नोव्हेंबरला ‘जागतिक व्हेगन डे’ साजरा केला जातो. साहजिकच यावर्षीच्या 1 नोव्हेंबर रोजी ‘रौप्यमहोत्सवी व्हेगन डे’ साजरा होईल.

– [email protected]