गुरुचा राशीबदल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सुनील पुरोहित

नुकताच गुरूचा तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश झाला. त्यानिमित्ताने अभिजित प्रतिष्ठान या डेस्टिनी मॅनेजमेंट शिकविणाऱया संस्थेच्या वतीने पुढील प्रकारे निरीक्षणे नोंदविली आहेत.

वृश्चिकेमध्ये प्रवेश करणारा गुरू सुरुवातीला 20 नोव्हेंबरच्या सुमारास मंगळाबरोबर केंद्रयोग करीत असून अधिकारावरून किंवा ज्येष्ठताक्रमावरून मतभेद होण्याचा संभव आहे, तसेच तंत्रज्ञान विरुद्ध सामाजिक दृष्टिकोन असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच 26 नोव्हेंबर रोजी होणारी रवी-गुरू युती धर्मसत्ता व राजसत्ता एका दिशेने कार्यरत होतील असे दिसते.

ग्रहांचे राशीबदल आणि योग बदलत असताना त्यांचा प्रतीकात्मक दृष्टीने विचार केला पाहिजे. गुरू बुद्धिजीवी किंवा प्रस्थापित वर्गाचे, सत्ता असणाऱया वर्गाचे प्रतिनिधित्व करतो असे मानले जाते, ज्यामध्ये न्यायपालिका, समाजातील चिंतक यांचा समावेश असतो आणि या वर्गाची आगामी काळातील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. तूळ राशी प्रदर्शन तंत्र, मार्केटिंग आणि भावनांच्या खिलाडू बाजूंना प्रोत्साहन देत असते. म्हणूनच तुळेतील गुरू असताना समाजमन दांभिक समज, वरवरचे चिंतन यांच्या भोवती घुटमळत राहते. जनमत तयार करताना कोपरखळय़ा, सहज केलेल्या चर्चा पूर्वी खिलाडू वृत्तीने स्वीकारल्या जात होत्या. तसेच समाजातील प्रत्येक घटकसुद्धा नाटय़पूर्ण रीतीने आपले अस्तित्व दाखवीत होता. आगामी काळात बदला घेण्याची वृत्ती वाढून खुनशी वृत्ती बळावण्याचा संभव आहे.

सामान्यतः गुरू या ग्रहाची प्रतिमा समंजस, मध्यममार्गी व सम्यक दृष्टिकोण बाळगणारा अशी असते, परंतु गुरू भ्रमणाच्या या काळात मात्र विविध क्षेत्रांमध्ये विरोधकांना संपविण्यासाठी कारस्थाने रचली जातील तसेच सापळे व प्रतिसापळेदेखील रचले जाण्याचा संभव आहे.

राजकारण तसेच समाजातील कोणत्याही क्षेत्रामधील बुद्धिवंत वर्ग माहिती आणि त्याचा वापर अथवा गैरवापर करण्याचा धोका आहे. सहज म्हणून केलेल्या गोष्टी अंगलट येण्याचा संभव आहे.

यातील पहिल्या टप्प्यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तींना बुद्धिजीवी वर्ग संरक्षण देण्याचा संभव असून त्यामुळे समाजामध्ये तिरस्कार वाढीस लागण्याचा संभव आहे, आपल्या चिंतन प्रवृत्तीमधील गुन्हेगारांचे भलामण होण्याचा संभव आहे म्हणूनच या काळामध्ये यशस्वी होण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या योजना आखताना स्वतःचा बचाव करण्याचे मार्ग समजून घेऊनच पावले टाकली पाहिजेत. केवळ शक्तिप्रदर्शन करून यश मिळणार नसून कदाचित त्याचा विपरीत परिणाम होऊ शकेल म्हणूनच अत्यंत गतिमान असणारा गुरू लवकरच पुढचा राशीबदल करीत आहे. मात्र हा बदल अल्पजीवी ठरणार आहे. म्हणजेच तात्कालिक घडणारे बदल काळाच्या कसोटीवर टिकणे कठीण जाईल आणि वरील बदल रद्द करावे लागतील. विशेषतः हिंदुस्थान हा गुरुप्रधान संस्कृती असणारा देश असून हिंदुस्थानी समुदायाचे जगात अनेक ठिकाणी संस्कृती संघर्ष विकोपाला जाण्याचा संभव आहे. परदेशातील हिंदुस्थानींनीसुद्धा याची नोंद घ्यावी व सांस्कृतिक अहंकारापेक्षा व्यावहारिक सामोपचार महत्त्वाचे ठरतील हे लक्षात घ्यावे.

वृश्चिक राशीचे स्वरूप – ही राशी शांत, चिंतक आणि निर्भीड असून त्यामध्ये सारासार विचारांपेक्षा योजनाबद्ध कृतीवर जास्त विश्वास असतो. राशीचक्रातील आठवी म्हणजे मृत्यू दर्शक राशी असून विशाखा नक्षत्राने (विशोत्तरी सिद्धांताने गुरूचे) तूळ आणि वृश्चिक राशी जोडल्या आहेत. मंगळ श्रद्धावान ग्रह असून वृश्चिक त्याची योजनाबद्ध कार्य करणारी राशी आहे. हे वर्णन जर काव्यात्मक माध्यमातून मांडल्यास पुढीलप्रमाणे असेल.

गुरू बदललाय आता गुरू बदललाय
गुरू बदललाय आता गुरू बदललाय
सावध रहा आता गुरू बदललाय
तुळेच्या मिठीतून स्वप्नांच्या जगातून
साखरझोपेतून वास्तवाच्या दुनियेसाठी
गुरू बदललाय आता गुरू बदललाय
दाखवू नका ऐट अन् समजू नका येडा
त्याच्या सोबत आहे यमाचा रेडा
धूर्त होण्यासाठी, बदला घेण्यासाठी
मातृभूच्या प्रेमात आणि स्वतःच्या नक्षत्रात
गुरू बदललाय आता गुरू बदललाय
कृपादृष्टी ती कारस्थानी राहूवरी
शिरलाय मंगळाच्या षडयंत्री घरी
शनीच्या वाटेने स्वतःच्या तोऱयात
फडशा उडेल आता सिंधूच्या खोऱयात
गुरू बदललाय आता गुरू बदललाय

गुरू या ज्योतिषीय कल्पनेची तीन रूपे आहेत

धनु – नैसर्गिक कुंडलीतील धनु या राशीशी अधिपत्य सांगणारा हा गुरू अहंकारी, अधिकार गाजविणारा, महत्त्वाकांक्षी, शिक्षा देणारा, प्रवाह निर्माण करणारा, न्याय कल्पनेचा पुरस्कार करणारा, कीर्तीसाठी झटणारा, सारासार विवेक बाळगणारा, परंतु अग्नी तत्त्वाचा असल्यामुळे निर्भीड, म्हणून अग्रेसर राहणारा सेनानी गुरू होय.

मीन – या राशीशी साधर्म्य व अधिपत्य असणारा म्हणजे परंपरांचा घटक असणारा, माहितीचे अथांग साधन असणारा, सात्त्विक, सद्गुणी, तत्त्वज्ञानी, विवेकी, पूर्वग्रहयुक्त, धर्मभिरू, पापभिरू, प्रतिमा जपणारा, साहित्य, संस्कृती यांचा पुरस्कर्ता मदतनीस, संग्रह करणारा चिंतक आणि सुखासीन गुरू.

गुरूचे स्वाभाविक रूप – या दोन्ही राशी कल्पनांचे एकत्रित स्वरूप असणारा म्हणूनच कधी परंपरांना चिकटून राहणारा तर कधी न्याय कल्पनेसाठी परंपरांना छेद देणारा, उदा. कौटिल्यसुद्धा गुरूचे तिसरे रूप होय. भाग्य आणि दुर्भाग्य यांचे एकत्रित रूप म्हणजे गुरू असेसुद्धा आपण म्हणू शकतो.

चंद्र राशीफळ
ज्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये चंद्र कर्क, मीन व वृषभ राशीमध्ये आहे, त्यांना सामाजिक आश्रय व वैचारिक पाठबळ मिळण्याचा संभव आहे. अन्य व्यक्तींसाठी हा बदल विशेष महत्त्वाचा मानू नये.

गुरू नुकताच तूळ राशीतून वृश्चिक राशीत आला आहे. त्याचे प्रत्येक राशीला मिळणारे फळ पुढीलप्रमाणे सांगता येईल.

मेष- यांच्यासाठी वृश्चिकेमधील गुरू प्रवाहाविरुद्ध पोहण्यासारखे असून इतरांचा विश्वास संपादन करणे जड जाईल, तसेच शिक्षण व गुंतवणूक विषयामध्ये अडचणी निर्माण होण्याचा संभव आहे.

वृषभ- गुरूचे हे भ्रमण सामाजिक कार्यातील व्यक्तींसाठी शुभसूचक असून नातेसंबंध योग्य दिशेने पुढे सरकतील. प्रतिष्ठा वृद्धिंगत होण्याचा संभव असून बुद्धिजीवी वर्गाची साथसोबत लाभण्याचे योग दिसतात.

मिथुन- नोकरी-व्यवसायासाठी हे शुभसूचक असून कर्जे मिळणे शक्य होईल, तसेच सोबत करण्यासाठी योग्य अनुयायी, पाठीराखा लाभण्याची शक्यता दिसते.

कर्क- महत्त्वाकांक्षा वाढीस लागण्याचा संभव असून दूरगामी कार्यासाठी हे शुभलक्षण ठरावे. कुटुंबासाठी महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. नव्या विचारांना योग्य दिशा मिळण्याचा संभव आहे. व्यावसायिकांना प्रतिष्ठा मिळेल.

सिंह- वडिलोपार्जित संपत्तीचे प्रश्न निर्माण होऊन त्यात काहीतरी तोडगा निघण्याचा संभव आहे. जुन्या संस्कारांना नवा आशय मिळण्याचा संभव आहे. कौटुंबिक आघाडीवर सहमती करण्यासाठी ही वेळ योग्य ठरावी.

कन्या- घरबदल, मध्यस्थीने कामे होतील. लेखन किंवा अन्य प्रकारे साहित्य निर्मिती घडू शकेल. आर्थिक व्यवहारातल्या व्यक्तींसाठी हा शुभसूचक योग असेल, तर जोडव्यवसायाच्या शक्यता आकार घेतील.

तूळ- कुटुंबामधील वातावरण सकारात्मक होण्यास मदत होईल. शुभकार्ये घडण्या/घडविण्याच्या दृष्टीने शुभ होय. आर्थिक प्रश्नाला योग्य दिशा मिळेल. केलेल्या चुकांवर पांघरुण घालण्याची संधी मिळेल.

वृश्चिक- प्रतिष्ठा वाढीस लागेल. विचारांच्या कक्षा रुंदावण्याचा संभव असून आपल्यामधील सामाजिक जाणिवा वृद्धिंगत होण्याचा संभव असून सामाजिक बांधिलकीच्या दिशेने प्रगती घडेल.

धनु- गुंतवणुकीसाठी विशेष महत्त्वाचा काळ असून प्रवास घडण्याचा संभव आहे. या काळात देणग्या देणे व जमविणे संभव असून कर्जे मिळणे व फेडणे शक्य होणार आहे.

मकर- नवे नातेसंबंध आकार घेतील तसेच मित्रपरिवार व दिनचर्येमध्ये बुद्धिजीवी वर्गाची साथ लाभेल. जुने लाभ पदरात पाडून घ्याल तसेच प्रगती व प्रसिद्धीच्या नव्या वाटा मिळण्याचा संभव आहे.

कुंभ- शैक्षणिक क्षेत्रात प्रगती कराल. सामाजिक कार्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले जाण्याचा संभव असून कार्यक्षेत्रात अनुकूल बदल घडतील. सांपत्तिक प्रश्न सुटण्याचा संभव आहे.

मीन- दूरचे प्रवास घडतील. प्रसिद्धी व लोकप्रियता दोन्हीच्या दृष्टीने हा बदल शुभसूचक आहे. भाग्याची साथ लाभेल तसेच बौद्धिक क्षेत्रात कार्य करणाऱयांसाठी विशेष शुभ होय.