
सामना प्रतिनिधी । कुडाळ
राज्याचे सहकार,पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख सोमवारी सिंधुदुर्ग दौर्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत दुपारी 3 वा. कुडाळ येथील मराठा समाज हॉल येथे सहकार कार्यकर्ता मेळावा होणार आहे. या मेळाव्यास पालकमंत्री दिपक केसरकर व सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांची प्रमुख उपस्थिती असणार असून सहकार क्षेत्रातील विविध प्रश्न या मेळाव्याच्या निमित्ताने मार्गी लागले जाणार असल्याची माहिती भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक अतुल काळसेकर यांनी कुडाळ येथे पत्रकार परिषदेत दिली.
कुडाळ एमआयडीसी येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत काळसेकर बोलत होते. भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष अमित आवटे, बंड्या सावंत, विजय कांबळी, राजेश पडते, योगेश बेळणेकर आदी उपस्थित होते.
काळसेकर म्हणाले की, “सोमवारी सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 वा. ना देशमुख यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे सहकार, पणन विभागाची आढावा बैठक, दुपारी 12.30 वा. ओरोस येथे जिल्हा बँकेस भेट त्यानंतर तेथेच जिल्हा बँक व भागिरथ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यामाने युपीआरएनएम-2 प्रकल्पाचे उद्घाटन देशमुख यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. 3 ते 5.30 वा. या वेळेत कुडाळ मराठा समाज हॉल येथे सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा मेळावा होणार असुन देशमुख मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यानंतर तेथेच अभिनव सहकारी संस्थांचे मुख्य प्रवर्तक आणि मजुर सहकारी संस्थांसोबत देशमुख चर्चा करणार आहेत.”
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहकार क्षेत्रातील उच्च प्रतीचे काम आहे. खावटी कर्जाचा प्रश्न सरकारने मार्गी लावला आहे. यामुळे जिल्हातील साडेनऊ हजार शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात मच्छिमार सोसायटीचा डिझेल कोट्याचा परतावा तसेच मजुर सहकारी संस्थांचे जे प्रश्न आहेत ते या मेळाव्याच्या माध्यमातुन सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सक्षमीकरण करणे, काजु बोंडुवर प्रक्रिया करण्यासाठी पथदर्शी सहकारी पतसंस्था स्थापन करणे आणि जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील प्रश्न मार्गी लावण्याबाबत प्रयत्न केले जाणार आहेत. या मेळाव्यास सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन अतुल काळसेकर यांनी केले आहे.






























































