मृत, स्थलांतरित झालेले नागरिकही मतदार यादीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । नगर

महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाकडून गुरुवारी (दि. 25) प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्हा निवडणूक शाखेकडून पुरविण्यात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या यादीच्या आधारे मनपाने याद्या तयार केल्या आहेत. मात्र, यात अनेक वर्षांपूर्वी मयत झालेल्या, वर्षानुवर्षे शहराबाहेर स्थलांतरित असलेल्या नागरिकांची नावे वगळण्यात आलेली नसल्याचे समोर आले आहे. ‘बीएलओ’नी घरोघरी जाऊन मतदार पडताळणी करण्याचे राज्य निवडणूक आयोगाने दिलेले आदेश व त्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून पार पडलेला मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रमही कागदावरच राबविल्याचे यानिमित्ताने चव्हाटय़ावर आले आहे.

डिसेंबर महिन्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी आयोगाच्या निर्देशानुसार 1 सप्टेंबर रोजीची विधानसभा मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली आहे. याच यादीनुसार महापालिकेच्या प्रभागनिहाय याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत. यात काही प्रभागांमध्ये वर्षानुवर्षे शहराबाहेर असलेल्या, इतर तालुक्यात स्थलांतरित झालेल्या मतदारांची नावे समाविष्ट आहेत. तसेच मागील मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी मयत झालेल्या मतदारांची नावेही यातून वगळण्यात आलेली नाहीत. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार बीएलओनी घरोघरी जाऊन मतदार पडताळणी केली असती तर ही बाब समोर आली असती. मात्र, जिल्हा निवडणूक शाखेऐवजी स्थानिक नेते, नगरसेवकांचे बीएलओवर नियंत्रण असल्यामुळे व त्यांच्या कार्यालयात बसूनच याद्यांचे पुनरीक्षण केले जात असल्यामुळे आयोगाला अभिप्रेत असलेल्या बिनचूक मतदार याद्या तयारच झालेल्या नाहीत. त्यामुळे निवडणूक शाखेच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महापालिकेची निवडणूक यंत्रणाही अपुरीच
राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर वाढविला आहे. प्रभाग रचना, मतदार याद्या तयार करण्यासाठी संगणकीय तंत्रज्ञान वापरले गेले. महापालिकेत मुळातच तांत्रिक पात्रता असलेल्या अधिकारी व कर्मचाऱयांची वानवा आहे. त्यामुळे ठरावीक अधिकारी, कर्मचारीच निवडणूक कामात भरडले जात आहेत. महापालिकेचा कारभार सध्या जिल्हाधिकारी भवनातून होत असल्याने आयोगाशी पत्रव्यवहार, प्रशासकीय मान्यता व मंजुरीसाठी प्रभारी आयुक्तांकडे हेलपाटे मारण्यातच अधिकाऱयांचा वेळ खर्ची पडत आहे. तांत्रिक यंत्रणा अपुरी असल्यामुळे महापालिकेला संकेतस्थळावरही मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात अपयश आले आहे.