
सामना प्रतिनिधी । मालवण
मालवण शहरातील धुरीवाडा सेवांगण मार्ग येथील पावलु जॉन रॉड्रिक्स कुटुंबीय आपल्या परिसरातून जाणाऱ्या धोकादायक वीज वाहिन्या हटवण्यासाठी वीज वितरणशी 10 वर्ष लढा देत आहेत. मात्र वीज वाहिन्या हटवणे अथवा त्यांचा मार्ग बदलणे याबाबत कोणतीही कार्यवाही होत नसल्याने रॉड्रिक्स कुटुंब हतबल झाले आहे. दोन दिवसांपूर्वी या धोकादायक मार्गावरील एक वीज वहिनी तुटून पडली. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही. दरम्यान धोकादायक वीज वाहिन्या तात्काळ हटवा अशी मागणी रॉड्रिक्स कुटुंबीयांनी पुन्हा एकदा वीज वितरणकडे केली आहे.
पावलु रॉड्रिक्स गेली 10 वर्षाहून अधिक काळ सातत्याने वीज वितरणकडे वीज वाहिन्या हटवण्याबाबत पाठपुरावा करत आहेत. डेविड, ग्रेसीस या अन्य दोन भाऊ व कुटुंबीय यासोबत राहत असलेल्या घर परिसरातून या वीज वाहिन्या जातात. मासेमारी साहित्य व अन्य किंमती लाकडी साहित्य असलेली झोपडी जवळून वीज वाहिन्या जातात. स्पार्ककिंग होऊन झोपडीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याचा तसेच अन्य अपघात होण्याचा धोका आहे. माड बागायतीतील काही झाडांची झावळ्या वीज वाहिन्यांना स्पर्श करतात म्हणून वीज कर्मचारी सातत्याने तोडतात. त्यामुळेही त्यांचे नुकसान होत आहे.
लगतच्या वीज ग्राहकांची अन्य वीज मार्गाची उभारणी झाली आहे. अशा स्थितीत रॉड्रिक्स परिसरातून जाणाऱ्या धोकादायक स्थितीतील विनापरवाना वीज वाहिन्या हटवाव्यात अशी मागणी रॉड्रिक्स कुटुंबीय यांनी केली आहे. तसेच न्याय न मिळाल्यास उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे.
































































