उरणमध्ये 400 लिटर गावठी दारू जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। न्हावाशेवा

गावठी दारू धंद्याच्या विरोधात उरण पोलिसांनी आपली मोहिम तीव्र केली आहे. रविवारी पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल 400 लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली आहे. या दारूची किंमत अंदाज 40 हजार रूपये आहे. या प्रकरणी मच्छिंद्र धनाजी थळी (52) रा. करंजापाडा, करंजा, उरण याला अटक केली आहे.

पोलीस नाईक सागर डाकी यांना गावठी दारुची माहिती मिळाली होती. त्यानंतर उरणचे सहाय्यक पोलीस निरिक्षक निलेश तांबे आणि जी.व्ही कराड यांच्या पथकाने ही कारवाई केली. द्रोणागिरी डोंगरांच्या पायथ्याजवळ हा गावठी दारू बनविण्याचा कारखाना होता. पोलिसांनी केलेल्या कारवाईत चार निळ्या रंगाचे गावठी दारूचे ड्रम अंदाजे 400 लिटर, दारू बनविण्यासाठी लागणारा स्टोव्ह, प्लास्टीकची टाकी, पत्र्याची टाकी आणि दारू बनविण्यासाठी लागणारे रसायन जप्त केले. कारवाईनंतर पोलिसांनी दारू बनविण्यासाठी लागणारे जप्त केलेले साहित्य जाळून नष्ट केले. पोलिसांच्या या कारवाईबद्दल अभिनंदन होत असले तरी उरणच्या पूर्व भागात असलेले अनेक अनधिकृत दारूचे गुत्त्यांवर देखिल कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे. या भागात अनेक ठिकाणी विषारी आणि केमिकल युक्त गावठी दारू विकली जात असून ही दारू प्यायल्यामुळे अनेक कोवळ्या आदिवासी मुलांना आरोग्याच्या समस्या उद्भवल्या आहेत. त्यामुळे भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.