
काशिराम गायकवाड । कुडाळ
कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना व स्वाभिमान पक्ष रिंगणात उतरणार आहेत. शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी देवानंद ऊर्फ सचिन काळप तर स्वाभिमान पक्षाकडून ओंकार ऊर्फ बिट्टू तेली उद्या (31 ऑक्टोबर) नामनिर्देशन पत्र दाखल करणार आहेत. सोमवार 5 नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची अधिकृत निवड घोषित केली जाणार आहे.
गरपंचायतीचे नगराध्यक्ष विनायक राणे व उपनगराध्यक्ष अनंत ऊर्फ आबा धडाम यांची 12 मे 2016 रोजी निवड करण्यात आली होती. त्यांचा प्रथम अडीच वर्षांचा पदावधी 11 नोव्हेंबर 2018 रोजी समाप्त होत आहे. त्यापूर्वी ही निवडणूक होत आहे. नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून सचिन काळप यांच्या नावाला पसंती देण्यात आली आहे. तर स्वाभिमान पक्षाकडून गटनेते तथा बांधकाम सभापती ओंकार तेली यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. दोघेही बुधवारी नामनिर्देशनपत्र दाखल करणार आहेत. स्वाभिमानकडून नगराध्यक्ष पदासाठी विद्यमान नगराध्यक्ष विनायक राणे यांच्यासह गटनेते ओंकार तेली, उपनगराध्यक्ष आबा धडाम, नगरसेवक सुनील बांदेकर, नगरसेविका सौ.संध्या तेरसे इच्छूक होते मात्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा खासदार नारायण राणे यांनी ओंकार तेलींच्या नावाला पसंती दिली. त्यानुसार मंगळवारी जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी तेली यांचे नाव जाहीर केले. उपनगराध्यक्ष पदासाठी आरोग्य सभापती सौ.साक्षी सावंत, नगरसेवक सुनिल बांदेकर, सौ. अश्विनी गावडे व सौ.सरोज जाधव यांची नावे चर्चेत आहेत.
सध्या नगरपंचायतीत स्वाभिमान – 9, शिवसेना – 6, भाजपा – 1 व अपक्ष 1 असे पक्षीय बलाबल आहे. तसेच शिवसेना व स्वाभिमान यांचे 1-1 स्विकृत नगरसेवक आहेत. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची अधिकृत निवड 5 नोव्हेंबर रोजी घोषित करण्यात येणार आहे.























































