
सामना प्रतिनिधी । मुंबई
पंजाब नॅशनल बँकेला साडेतेरा हजार कोटींचा चुना लावून परदेशात पसार झालेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी पुन्हा हिंदुस्थानात परतण्याची शक्यता आहे. हिरे उद्योगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मेहूल चोक्सीने त्यांची कंपनी गीतांजलीत काम करणाऱया लोकांशी संपर्क साधला असून त्याने पुन्हा हिंदुस्थानात परतण्याचे संकेत दिले आहेत.
लवकरच मी हिंदुस्थानात परतणार असून पुन्हा व्यवसायाला सुरुवात करणार आहे. त्याबाबत सरकारशी माझी चर्चा सुरू आहे. कंपनीत काम करणाऱया लोकांनी कंपनी सोडून कुठेही जाऊ नये. ज्यांचे पगार बाकी आहेत ते आल्यानंतर देईन, अशी चर्चा मेहुल चोक्सीने त्याच्या कंपनीतील लोकांशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तब्बल 5 हजार लोक त्यांच्या कंपनीत काम करतात. गीतांजली कंपनीत काम करणाऱया कर्मचाऱयाने दिलेल्या माहितीनुसार परदेशातदेखील चोक्सीची भरपूर संपत्ती आहे. हिरेतज्ञ हार्दिक हुंडिया म्हणाले की, परदेशात जाऊन व्यवसाय सुरू करणाऱया लोकांनी देशातच व्यवसाय सुरू केला तर देशातील लाखो लोकांना रोजगार प्राप्त होतील. मेहुल चोक्सीने मायदेशात परतण्याची तयारी दर्शवली असेल तर ती स्वागतार्ह आहे. मेहुल चोक्सीने मायदेशी परतल्यावर बँकांचे कर्ज भरले तर हिरे उद्योगाला चार चाँद लागतील. मेहुल चोक्सीची विदेशात अमाप संपत्ती आहे. त्याने मनात आणले तर तो कर्ज सहज फेडू शकतो, असे या क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे.

























































