
सामना ऑनलाईन । गडचिरोली
गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यात शासकीय आश्रमशाळेतील एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींमध्ये यशवंत दुर्गे (19), मानतू ईष्टाम (30) यांच्यासह तीन विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे. या प्रकरणाची दखल घेत आदिवासी विकास राज्यमंत्र्यांनी आश्रमशाळेला भेट देऊन अधीक्षक आणि मुख्याध्यपकाला तत्काळ निलंबीत करण्याचे आदेश दिले आहेत.
अहेरी तालुक्यातील पेरमिली येथील शासकिय आश्रमशाळेत पीडित विद्यार्थिनी शिकत आहे. आश्रमशाळेच्या बाजूला असलेल्या जंगलात मित्रासोबत पीडित विद्यार्थिनी फिरायला गेली होती, यावेळी आरोपींनी तिचा विनयभंग करुन मोबाईलमध्ये चित्रीकरण केले होते. पीडितेने कशीबशी नराधमांपासून सुटका करून घेत पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार नोंदवली.
दरम्यान, आदिवासी विकास राज्यमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री अमरीश आत्राम यांनी आश्रमशाळेला भेट देऊन या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. यावेळी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना जंगलात जाण्याची परवानगी दिलीच कशी असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला. त्यामुळे या प्रकरणात अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेऊन आश्रमशाळेचे अधीक्षक आणि मुख्याध्यापकांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश अत्राम यांनी दिले.






























































