शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर शिवसेनेचे ढोल आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। कळमनुरी

कळमनुरी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाल्यामुळे शिवसेनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी महावितरण कार्यालयासमोर बुधवारी ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.

शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या मोर्चामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर, जि.प. अध्यक्षा शिवराणी प्रकाश नरवाडे, शिवसेना जिल्हा सहसंपर्वâप्रमुख राजेंद्र शिखरे, पं.स. उपसभापती अजय उर्फ गोपु पाटील, जि.प. सदस्य बाळासाहेब मगर, जि.प. सदस्य फकीरा मुंडे, राम कदम, नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख डी. के. दुर्गे, शिवसेना तालुकाप्रमुख सखाराम उबाळे, नगरसेवक संतोष सारडा, रुपेश पतंगे, मयूर शिंदे, संभाजी कहाळे, बाळू ससे, आर.आर. पाटील, ईश्वर तरटे, शिवा शिंदे, बबनराव शिंदे, सुनील पाईकराव, संदीप भोसले, गणेश टाक, वैजनाथ बोक्से, शंकर कदम, अमित शिंदे, विजय कदम यांच्यासह हजारो शेतकरी व शिवसेना-युवासेना पदाधिकारी व शिवसैनिकांची उपस्थिती होती.

यावेळी ईसापूर धरणाचे पाणी सोडण्यात येणार असून ते पाणी शेतकऱ्यांना मिळावे यासाठी उच्च दाबाने विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. तसेच विद्युत पुरवठा उच्च दाबाने व सुरळीत करुन आवश्यकतेनुसार रोहित्र देण्यात यावे, कळमनुरी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाल्यामुळे शेतकऱ्याचे वीज देयके माफ करावी, वीज भारनियमनाची वेळ रात्री साडे बारा ऐवजी रात्री 8 ते 10 या दरम्यान करण्यात यावे, रोहित्र जळाल्यानंतर शेतकऱ्यांना 2 ते 3 दिवसात विद्युत रोहित्र उपलब्ध करुन देण्यात यावे, सक्तीची वीज बिल वसुल बंद करण्यात यावी, आठ तास वीज पुरवठा करण्यात यावा, दाती येथे मंजुर झालेल्या 33  के.व्ही. सबटेशनचे काम लवकरात लवकर सुरु करण्यात यावे, कडपदेव येथील 33 के.व्ही. सबटेशन मंजुर करण्यात यावे व लवकरात लवकर कामकाज करावे, रोहित्राची आवक-जावक, वाहन टेंडर बंद झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. ते सुरु करण्यात यावे, एचओडीएस योजनेंतर्गत शेतकऱ्यांना रोहित्र उपलब्ध करून काम सुरु करण्यात यावे, वाढीव एपीएल व बीपीएल मीटर कळमनुरी तालुक्यात जास्तीत-जास्त उपलब्ध करुन देण्यात यावे, यासह विविध मागण्यासाठी कळमनुरी शहरातून विविध मार्गाने ढोल वाजवत महावितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्याचे निवेदन महावितरणचे उपविभागीय अभियंता रेनकोटवार यांना देण्यात आले. यावेळी रोहित्र व वीजेचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले.