बरकडेच्या पालकांना 10 लाखांची मदत, बिबट्याच्या शोधासाठी पिंजरे, ट्रॅप कॅमेऱ्याची नजर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रतिकात्मक छायाचित्र

सामना प्रतिनिधी । शिरापूर

बिबटयाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या आठ वर्षीय सारीका संतोष बरकडे हीच्या नातलगांना वनविभागामार्फत 10 लाख रूपयांची मदत जाहीर करण्यात आली असून त्यापैकी 3 लाखांचा धनादेश बुधवारी दुपारी तिच्या वडीलांकडे सुपूर्द करण्यात आला. दरम्यान, बुधवारी सकाळी पारनेर येथील ग्रामीण रूग्णालयात दुर्देवी सारीकाचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर सकाळी 11.30 वाजता शिरापूर येथे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मेंढपाळाचा व्यवसाय करणा-या संतोष बरकडे यांचा शिरापूरच्या नरसाळवाडी येथे वाडा असून मंगळवारी सायंकाळी दुर्दैवी सारीका झोपडीसमोर बाळाला खेळवित असताना बिबटयाने झडप घालून तिला एक किलोमिटर अंतरावर असलेल्या उसामध्ये फरफटत नेले होते. ग्रामस्थांनी उसात जाऊन शोध घेतला असता बिबट्या सारीकाच्या शरीराचे लचके तोडीत असल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहीती वनखाते तसेच पोलिसांना देण्यात आल्यानंतर सुमारे दोन तासाच्या अंतराने अधिकारी व कर्मचारी तेथे दाखल झाले. घटनेचा पंचनामा करण्यात येउन मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेण्यात आला.

या दुर्घटनेची वनखात्याने गंभीर दखल घेत सानिकाचे वडील संतोष बरकडे यांना 3 लाखांचा धनादेश सुपूर्द केला. मधुकर उचाळे, डॉ. भास्कर शिरोळे, सरपंच भास्कर उचाळे हे यावेळी उपस्थित होते. उर्वरीत सात लाख महिनाभरात संतोष बरकडे यांच्या नावे बँकेत ठेव म्हणून ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी दुर्घटना घडल्यानंतर वनखात्याने म्हस्केवाडी येथून दोन पिंजरे आणून बिबटयाच्या वावराच्या ठिकाणी लावण्यात आले.

बुधवारी आणखी पाच पिंजरे आणण्यात आले असून ते ग्रामस्थांच्या सल्ल्याने लावण्याचे काम सुरू होते. बिबटयावर लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅप कॅमेरे बसविण्यात येत असून त्याद्वारे बिबट्यास जेरबंद करण्याची योजना आखण्यात येईल. ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्यावर लक्ष ठेवण्यासाठी वनकर्मचाऱ्यांसह एक पथक तयार करण्यात येणार असून पथकाने माहीती देताच पुढील कार्यवाही तात्काळ करण्यात येणार असल्याचे वनपरीक्षेत्र अधिकारी मनिषा भिंगे यांनी सांगितले.

दरम्यान, या दुर्घटनेमुळे भयभित झालेल्या ग्रामस्थांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन शेतीसाठीचा विजपुरवठा दिवसा करण्याची मागणी केली. 5 नोहेंबरपर्यंत सकाळी वीजपुरवठा सुरू न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. उपवनसंरक्षक एम आदर्श रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक रमेश देवखिळे, फिरत्या पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल थिटे, पारनेरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी मनिषा भिंगे हे बुधवारी शिरापूर येथे ठाण मांडून होते.