
बाळ तोरसकर,[email protected]
प्रत्येक सणांबरोबर खेळही बांधलेले असतात… दिवाळीतही असेच वैशिष्टय़पूर्ण खेळ खेळले जातात…
थोडय़ाच दिवसांत दिवाळीची सुट्टी सुरू होईल. काहींना मात्र मिळालीसुद्धा असेल. नुकतीच सहामाही परीक्षा संपल्याने एक वेगळाच बेत आखण्यात सगळेच मश्गुल असतील. गेल्या आठवडय़ापासूनच घरातल्यांची धावपळ लगबग सुरू झाली असेलच. पूर्वी दिवाळीचे सर्व पदार्थ घराघरांत बनवले जात असत. मात्र आता कामाचा व्याप व घरातील पती-पत्नी दोघेही कामावर असल्याने वेगवेगळे दिवाळीचे पदार्थ घरात न बनवता कोणते पदार्थ घरी बनवायचे व कोणते विकत आणायचे? हे नियोजनसुद्धा केले गेले असेल. दिवाळीत सुट्टीच्या वेळी कोणी दूरवर सहलीला जायचे तर कोणी परदेशी जाण्याचे नियोजनसुद्धा केले असेल. मात्र कोणी आजोळी-मामाच्या गावी, तर कोणी शहरातून आपल्या आजी-आजोबांच्या घरी जाण्याचे सुद्धा निश्चित केले असेल. गावी कोणाकोणाकडे जायचे व त्या वेळी तेथील मित्रांबरोबर कोणकोणते खेळ खेळायचे हेसुद्धा काही जणांनी ठरवले असेलच. पूर्वी सुट्टी म्हटली की, पकडा-पकडी, लगोरी, लंगडी, आंधळी कोशिंबीर, सागर गोटे आदी खेळ नक्की खेळले जात असत. पण सणसुदीचे काही खेळ हे निश्चित असतात. जसे श्रावणात भेंडला, गणपतीमध्ये झिम्मा-फुगडी, करमणुकीचे कार्यक्रम, नवरात्रीत गरबा खेळला जातो तसा दिवाळीतसुद्धा एक विशेष खेळ खेळला जातो, तो म्हणजे किल्ले बांधणे, पत्ते खेळणे व त्याचबरोबर फटाके फोडणे, रोषणाई करणे व रांगोळय़ांची स्पर्धा आयोजित करणे.
इतिहासात असे सांगितले जाते की, शहाजी राजांनी जिजाऊ व शिवरायांना पुण्याला पाठवले गेले त्या वेळी जिजाऊंनी शिवरायांना रामायण, महाभारत यातील कथा सांगून, वेगवेगळे युद्ध कला प्रशिक्षण देऊन त्यांना विविध क्षेत्रांत पारंगत करत होत्या. त्याच वेळी त्यांना वेगवेगळय़ा किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवून मुख्य किल्ला, माची व किल्ल्यावरील इतर सुविधा व त्याचे महत्त्व समजावून सांगत असत. हे झाले त्या वेळचे महत्त्व व गरज. मात्र त्यातूनच पुढे मुलांचे मनोरंजन म्हणून पुढे आलेला खेळ म्हणजे किल्ले बांधणे. दिवाळीत गावोगावी व काही शहरांतसुद्धा किल्ले बांधणे ही स्पर्धा आयोजित केली जाते. लहान मुले किल्ले बांधताना अतिशय मग्न होतात व धुंद होऊन किल्ले बांधतात. किल्ले बांधताना आपल्याला काही साहित्य मात्र नक्की एकत्र करावे लागते. त्यात महत्त्वाचे म्हणजे जो किल्ला बांधायचा आहे त्याचे चित्र, माती, दगड, विटा, लाल मुरूम, माती गोळा करण्यासाठी पोते व पाणी आदी साहित्य लागते.
किल्ले बांधताना एक विशेष काळजी घ्यायला हवी, ती म्हणजे कोणता किल्ला बांधायचा हे निश्चित केले जाते. जर त्याचे विस्तृत चित्र मिळाल्यास अतिउत्तम. जर उत्तम किल्ला बांधायचा असेल तर मात्र वरील साहित्याव्यतिरिक्त अजून काही साहित्य गोळा केल्यास उत्तम किल्ला बांधता येईल. काही झाडे बनवावी लागतील त्यासाठी काही तारा, ‘स्पंज’, हिरवा, तपकिरी व काळा-पांढरा, लाल रंग. तटबंदी व बुरूज करण्यासाठी कागद व पुट्टा नक्कीच वापरता येईल. छोटे छोटे झेंडे बनवणे, त्यासाठी कापड व काठय़ा या गरजेच्या असतात. लहान मुले व त्यांच्याबरोबरच मोठी माणसेसुद्धा हा खेळ खेळताना दिसतात. त्या वेळी किल्ल्याबरोबरच त्यावरील विहिरी बनवणे, तळे बनवणे या गोष्टीसुद्धा या स्पर्धेत चांगले गुण मिळवून देतात. त्याचबरोबर शेत दाखवणे व त्यावर काम करणारे शेतकऱयांचे पुतळेसुद्धा लागतात. हे किल्ले बनवल्यावर तो अजूनही वेगवेगळय़ा पद्धतीने सजवता येतो. मात्र या किल्ले बांधण्याच्या खेळात सर्वात महत्त्वाचे काय असेल तर ते मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व त्याची नेमकी जागा. या पुतळय़ाबरोबरच त्यांचे सोबती-सवंगडी, मावळे व शत्रू यांचेही पुतळे उभे केले तर मात्र किल्ले बांधण्याच्या या स्पर्धेत बाजी मारून जाल.
या महत्त्वाच्या खेळाबरोबरच दिवाळीत सर्वात आवडीने खेळला जाणारा खेळ म्हणजे पत्ते खेळणे. पत्त्यातील विविध डाव दिवाळीच्या रात्री खेळतात. माझ्या मते पत्ते खेळताना डावावर पैसे न लावता किंवा वस्तू न लावता जो डाव खेळला जातो तो पत्त्यांचा डाव उत्तम असाच म्हणावा लागेल. फराळाची चव घेत घेत या पत्त्यांच्या खेळात विविध पत्त्यांतील खेळ खेळता येतात. मग तो रमी असो, मेंढीकोट असो, पाच-तीन-दोन असो वा भिकार-सावकार, बदामी सत्ती असो वा झब्बू, गुलामचोर असो वा ब्रिज खेळताना नक्कीच मजा येते. खरे तर 52 पत्त्यांच्या या खेळात पत्ते पिसणे ही एक कालाच असते. लहानपणी एका वेळी 52 पत्ते पिसणे हे कधीच जमले नाही. मग त्याचे दोन गट्टे बनवायचे व एकएक गट्टा वेगवेगळा पिसायचा मग त्यानंतर हे दोन्ही गट्टे हळुवारपणे एकत्र मिसळत पत्ते पिसायचे व नंतर ते वाटायचे यात एक वेगळीच मजा यायची. त्यात लक्ष्मी पूजनादिवशी हिंदुस्थानातील बहुतेक भागात पत्ते खेळले जातात.
दिवाळीत रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या जातात. यात आता मुलींच्या बरोबरीने मुलेही या स्पर्धेमध्ये हिरीरीने भाग घेतात. दिवाळी साजरी करताना खेडोपाडय़ांत सकाळी घरोघरी शेणाच्या गवळणी घालतात व संध्याकाळी त्याच गवळणींचा पेंद्या बनवून कुणाचा पेंद्या उत्कृष्ट होतो? याचीही चुरस लागलेली असताना आपल्याला पाहायला मिळते. दिवाळीत मेणबत्तीने दिवे पेटवणे अशीही एक स्पर्धा आयोजित केली जाते. यात कमीत कमी वेळात सर्वात आधी मेणबत्तीच्या साहाय्याने जास्तीत जास्त दिवे पेटवणे यावर विजेता ठरतो. याचबरोबर दिवाळीत सर्वांना एकत्र बांधून ठेवत ‘हौजी’ हा खेळसुद्धा काही ठिकाणी खेळला जातो. त्याचबरोबर वेगवेगळय़ा मंडळांमध्ये किंवा गावागावांमध्ये दीपोत्सव साजरे केले जातात व त्या ठिकाणी संगीत खुर्ची, वेशभूषा, चित्रकला अशा स्पर्धा आयोजित केल्या जातात.
























































