सुनयना पोतनीस अनंतात विलीन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

शिवसेनेच्या माजी नगरसेविका सुनयना पोतनीस यांच्या पार्थिवावर काल दुपारी वांद्रे येथील शिक्षक कॉलनी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी यांनी सुनयना पोतनीस यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. अंत्ययात्रेत विभागातील हजारो नागरिक सहभागी झाले होते.

सुनयना पोतनीस यांचे अल्पशः आजाराने बुधवारी सकाळी वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात निधन झाले. त्यांचे पार्थिव वाकोला येथील यशवंत नगरातील पुष्पमंगल अपार्टमेंटमधील निवासस्थानाहून काल सकाळी शिवसेना शाखा क्रमांक 91 येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. तत्पूर्वी सौ. रश्मी ठाकरे आणि त्यांच्या आई, शिवसेना नेते-उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पोतनीस यांच्या निवासस्थानी जाऊन सुनयना पोतनीस यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. तसेच त्यांचे पती आमदार संजय पोतनीस यांचे सांत्वन केले.

महापौर विश्वनाथ महाडेश्वर, शिवसेना नेते अॅड. लीलाधर डाके, शिवसेना सचिव अनिल देसाई व आदेश बांदेकर, खासदार विनायक राऊत, विभागप्रमुख-आमदार अॅड.अनिल परब, आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, तृप्ती देसाई, सुनील प्रभू, अजय चौधरी, तुकाराम काते, मंगेश कुडाळकर, काँग्रेस आमदार भाई जगताप, माजी महापौर श्रद्धा जाधव व विशाखा राऊत, उपनेत्या मीना कांबळी, नगरसेवक मंगेश सातमकर, भाजपचे पराग अळवणी आदींनी सुनयना पोतनीस यांचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर वांद्रे येथील टीचर्स कॉलनी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.