
सामना ऑनलाईन । मुंबई
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची आज मुंबईत म्हाळगी प्रबोधिनीत भेट झाली. या भेटीवेळी राम मंदिर निर्माणाच्या मुद्द्यावर प्रामुख्याने चर्चा झाल्याचे वृत्त आहे. शिवसेनेने राम मंदिराच्या मुद्द्यावरून रान पेटवल्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या भाषणातून राम मंदिर निर्माणासाठी अध्यादेश काढा, असे म्हणत केंद्र सरकारला खडे बोल सुनावले होते. तसेच संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी मोदी सरकारला राजधर्माची आठवण करून दिली होती. या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे.
Mumbai: BJP President Amit Shah has met several RSS leaders, including its chief Mohan Bhagwat, on the sidelines of RSS executive meet in Bhayandar this morning. #Maharashtra
— ANI (@ANI) November 2, 2018
अमित शहा आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भाईंदर येथे होणाऱ्या बैठकीत सहभागी होण्यासाठी पहाटेच मुंबईत दाखल झाले आहेत. यावेळी ते संघाच्या ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधतील. याआधी सरसंघचालकांशी केंद्रातील मोदी सरकारवर चहू बाजूंनी होणारी टीका, शबरीमला संदर्भातील प्रश्न अशा विविध प्रश्नांवर यावेळी चर्चा झाल्याचे समजते. जवळपास तासभर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. यानंतर दुपारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती मिळते आहे.


























































