
सामना प्रतिनिधी । नांदेड
रस्त्यावर उभ्या राहीलेल्या व्यक्तींना चाकूचा धाक दाखवून व दहशत माजवून लुटमार करणाऱ्या तसेच शहरात तरोडा, श्रीनगर, आनंदनगर भागात अशीच लुटमार करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने आज सकाळी अटक केली असून, त्यांच्याकडून वेगवेगळ्या स्वरुपाचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत दै.सामनाचे वितरण सहकारी आनंदा विठ्ठलराव सावरकर हे राधेगोविंद हॉटेलसमोर वजिराबाद येथे सकाळी वितरणाचे काम करुन घरी जाण्यासाठी ऑटोची वाट बघत असताना त्यांना दोन मोटारसायकल आलेल्या सहा आरोपींनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळील नगदी २ हजार २०० रुपये, एटीएम कार्ड व आधारकार्ड बळजबरीने हिसकावून घेतले होते. सावरकर यांना त्यांनी बेदम मारहाणही केली होती. यासंदर्भात वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचे बारकाईने निरीक्षक केल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेने गेली तीन दिवस या प्रकरणाचा शोध घेणे सुरु केले. पोलीस निरीक्षक निकाळजे यांच्या सुचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक पी.डी.भारती यांनी सीसीटीव्ही कॅमेरा व मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपींचा शोध सुरु केला आणि आज पहाटे आरोपी शिवप्रसाद उर्फ सँडी लक्ष्मण बोडके, नविनबायबास रोड नांदेड, राणा ठाकूर नमस्कार चौक नांदेड, गौरव येनमेवाड रा.ब्राम्हसिंगनगर नांदेड, अनिल सुरेश पवार रा. गोविंदनगर, आकाश ठाकरे रा.आनंदनगर आणि गणेश गंगाधर शिंदे रा.लोणी ता.अर्धापूर यांना ताब्यात घेतले. त्यांनी सदरच्या गुन्ह्याची कबुली दिली असून, सावरकर यांना चाकूचा धाक दाखवून रक्कम व त्यांच्याजवळील साहीत्य लुटल्याची त्यांनी सांगितले.
नांदेड शहरात आनंदनगर, बाबानगर, व्हीआयपी रोड, डि मार्ट, मालेगाव रोड, शिवमंदिर रोड या भागात देखील त्यांनी चाकूचा धाक दाखवून मोबाईल व नगदी पैसे हीसकावून घेतल्याचे कबूल केले आहे. या आरोपीपैकी राणा ठाकूर यास स्थानिक गुन्हा शाखेने अटक केली होती. त्याच्याकडून मोटारसायकल चोरीची घटना उघडकीस आणली होती. नांदेड शहरात गेल्या तीन महीन्यात झालेल्या एकूण २२ ते २५ मोबाईल व लुटमारीच्या घटनांचा यामुळे छडा लागण्याची शक्यता आहे. पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी स्थानिक गुन्हा शाखेच्या टिमचे अभिनंदन केले आहे.


























































