संकट खरीपापाठोपाठ रब्बीच्या पेरण्याही यंदा घटणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

पावसाने ओढ दिल्याने खरीपापाठोपाठ रब्बी हंगामही धोक्यात आला आहे. जमिनीत ओल नसल्याने जिल्ह्यातील रब्बीच्या एक लाख हेक्टर क्षेत्रावरील पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. त्यात 97 हजार 456 हेक्टरवरील ज्वारीच्या पिकाची वाढ पूर्णपणे खुंटली आहे.

नगर जिल्ह्यात यंदा 1 व 2 जूनला मान्सूनपूर्व पाऊस झाला. त्यानंतर 21 ते 23 जूनपर्यंत चांगला पाऊस झाला. 23 जूननंतर मात्र पाऊस थांबला होता. जुलै महिन्यातील चार ते पाच दिवस चांगला पाऊस झाला. त्यानंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली होती. ऑगस्ट महिना पूर्णपणे कोरडा गेला. सप्टेंबरमध्ये काहीसा पाऊस झाला. तोही समाधानकारक नव्हता. जिल्ह्यात खरिपाचे 4 लाख 32 हजार हेक्टर क्षेत्र आहे.यंदा ऑगस्ट अखेरपर्यंत साडेतीन लाख हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या होत्या. मात्र, पावसाने दडी मारल्याने या पेरण्या पूर्णपणे वाया गेल्या आहेत. यंदा जिल्ह्यात 1 जून ते 30 ऑक्टोबरपर्यंत 69 टक्के पाऊस झाला आहे.

गेल्या वर्षी 1 जून ते 30 ऑक्टोबरपर्यंत 161 टक्के पाऊस झाला होता. यंदा 92 टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कमी पावसामुळे ग्रामीण भागातून टँकरला मागणी वाढू लागली आहे. ऑक्टोबर महिन्यातच पाण्याच्या टँकरची संख्या शंभरवर गेली आहे. यंदा पावसाअभावी खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. जिल्ह्यात खरिपाचे 4 लाख 30 हजार हेक्टर क्षेत्र असून, यंदा साडेतीन लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या होऊनही पाऊस नसल्यामुळे या पेरण्या वाया गेल्या आहेत.

खरीप वाया गेल्यामुळे शेतकर्‍यांची मदार रब्बी हंगामावर होती. मात्र, पावसाने ओढ दिल्याने रब्बी हंगामही वाया जाण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात रब्बीचे 6 लाख 67 हजार 261 हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी 30 ऑक्टोबर अखेरपर्यंत 1 लाख 4 हजार 144 हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. रब्बी हंगामातील ज्वारीच्या 97 हजार 456 हेक्टर पेरण्या झाल्या आहेत.जिल्ह्यात 4 लाख 69 हजार हेक्टर ज्वारीचे क्षेत्र आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पेरण्याही कमी झाल्या आहेत. गेल्या वर्षी 30 ऑक्टोबर 3 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. त्यात ज्वारीच्या 1 लाख 70 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. यंदा कमी पावसामुळे जमिनीत ओल राहिली नाही. त्यामुळे पेरण्या होऊनही पिकांची वाढ होत नाही. जिल्ह्यातील रब्बीच्या एक लाख हेक्टर क्षेत्रावरील पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. त्यात 97 हजार 456 हेक्टरवरील ज्वारीच्या पिकांची वाढ पूर्णपणे खुंटली आहे.

हरभरा, मकाही जळण्याच्या मार्गावर
रब्बी हंगामातील हरभरा व मकाच्या पेरण्या झाल्या असल्या, तरी त्या जळून जाण्याच्या स्थितीत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 861 हेक्टरवर मकाच्या तर 5 हजार 496 हेक्टरवर हरभर्‍याच्या पेरण्या झाल्या आहे. ग्रामीण भागात ही दोन्ही पिके जळण्याच्या मार्गावर आहेत.