कार्यादेश देण्यापूर्वीच कामे सुरू करणाऱ्या कंत्राटदारांचे पैसे रोखणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

संपूर्ण निविदा प्रक्रिया राबवल्यानंतर निवड झालेल्या कंत्राटदाराला प्रत्यक्ष कार्यादेश देण्यापूर्वीच काही ठिकाणी कामे सुरू केली जात असल्याची बाब पालिकेच्या दक्षता विभागाच्या निदर्शनास आली आहे. कार्यादेश देण्यापूर्वीच कामे सुरू केली गेल्यास यापुढे संबंधित कंत्राटदारांची बिले अदा न करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

वॉर्डातील विकासकामांसाठी निविदा मागवल्यानंतर संपूर्ण निविदा प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कंत्राटदारांची निवड झाल्यावर काही विभागांमध्ये कार्यादेश देण्यापूर्वीच काम सुरू झाल्याचे महापालिकेच्या ‘दक्षता खात्या’च्या अधिकाऱयांना आढळून आले आहे. दक्षता विभागाने ही बाब पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या निदर्शनास आणून दिली.  मुख्यालयात झालेल्या आढावा बैठकीच्या वेळी आयुक्तांनी या बाबीची गंभीर दखल घेतली आहे. कार्यादेश दिल्यानंतरच कुठलीही कामे सुरू व्हायला हवीत. यापुढे अशी बाब निदर्शनास आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा यावेळी आयुक्तांनी संबंधित अधिकाऱयांना दिला आहे.

 ‘सॅप’ प्रणालीमध्येच तरतूद करा

विकासकामे ही ठरलेल्या कार्यपद्धतीनुसारच व्हावीत यासाठी विभागस्तरावर सहाय्यक आयुक्तांनी काळजी घ्यावी असे आदेश शनिवारच्या बैठकीत  देण्यात आले. तसेच यापुढे कार्यादेश देण्यापूर्वीच काम सुरू झाले असल्याचे आढळल्यास कंत्राटदारांची बिले अदा करू नये, असेही आदेश त्यांनी दिले आहेत. तसेच पालिकेच्या संगणकीय ‘सॅप’ प्रणालीमध्ये या दृष्टीने आवश्यक प्रतिबंधात्मक तरतूद करण्याचेही निर्देश बैठकीत देण्यात आले.