राम मंदिराबाबत 6 डिसेंबरपूर्वी काहीतरी होणार; साक्षी महाराजांचे सूचक संकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अयोध्येत रामममंदिर निर्माणाचा मार्ग मोकळा झाला आहे. आता राम मंदिर निर्माणाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसल्याचे भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी स्पष्ट केले आहे. राम मंदिर निर्माण व्हावे अशी देशातील जनतेची इच्छा प्रबळ झाली आहे. तसेच साधुसंतानीही 6 डिसेंबरपूर्वी राम मंदिर निर्माणाबाबत काहीतरी हालचाली सुरू व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे जनमताचा आदर करत राम मंदिर निर्माणाबाबत 6 डिसेंबरपूर्वी नक्की काहीतरी घडेल असे सूचक संकेत साक्षी महाराज यांनी दिले आहेत. भाजप राम मंदिराच्या मुद्द्यावर ठाम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राम मंदिर निर्माणासाठी 6 डिसेंबरपूर्वी हालचाली झाल्या नाहीत तर साधुसंत देशभरात संमेलन भरवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. प्रयागराजमध्ये महाकुंभ होणार आहे. त्यामुळे राममंदिर निर्माणाशिवाय देशसमोर दुसरा कोणताच पर्याय नसल्याचे त्यांनी ठासून सांगितले. सरकारने कायदा केला, अध्यादेश आणला किंवा काहीच हालाचाली केल्या नाहीत तरी राम मंदिर होणार ही काळ्या दगडावरची रेष आहे असेही ते म्हणाले. देशातील जनता, साधुसंत यांच्या मताचा आदर करत नरसिंह राव सरकारने अधिग्रहीत केलेली जमीन राम जन्मभूमी न्यासाला द्यावी अशी मागणीही त्यांनी केली. 2019 पूर्वी राम मंदिर निर्माणाच्या कार्याला सुरुवात होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भाजप राममंदिर निर्माणाच्या मुद्द्यावर भाजप ठाम असल्याचेही त्यांनी सांगितले. 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी राम मंदिर निर्माणाचे काम सुरू होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी लवकरच खूशखबर देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राम मंदिरनिर्माणाबाबतची तारीख नक्की होईल असे संकेतही त्यांनी दिले.