
फटाक्यांशिवाय दिवाळी अपूर्ण आहे. पण थोडा इतरांचा विचार करून आवाजविरहित फटाके वाजवले तर माणसं, मुके प्राणी सगळय़ांचीच दिवाळी आनंदाची जाईल.
फटाके वाजवण्यासाठी काही कारणच हवे असे नाही. दिवाळी असो, वाढदिवस असो, खासगी वा सार्वजनिक कार्यक्रम असो, नाहीतर गल्लीबोळातली एखादी मिरवणूक असो, आपली आवाजाची ताकद दाखवण्यासाठी फटाके वाजवले जातातच. जणू फटाके हा आपला संस्कृतीचाच एक अविभाज्य घटक असून सणासुदीच्या दिवसात आपला आनंद तसेच विजय झाल्याचे प्रतीक म्हणून फटाके वाजवण्याची ‘प्रथाच’ हल्ली सुरू असल्याचे पाहावयास मिळते.
फटाक्यांना आपण इतके सरावलो आहोत की, त्याच्या आवाजाचा कुणाला त्रास होत असेल ही कल्पनाच मनाला शिवली नाही. पोलीस यंत्रणा असो नाहीतर न्याय व्यवस्था, कुणीही कितीही ओरड केली तरी फटाके वाजवण्याचे काही कमी होत नाही. मग त्यासाठी कितीही किंमत मोजावी लागली तरीही चालेल. यंदा मात्र सर्वोच्च न्यायालयाने या आवाजालाच दणका दिला आहे. म्हणे फक्त दोनच तास फटाके वाजवा तेही संपूर्ण दिवसभरात. हे पुढे घडणार आहे हे लक्षात घेऊन फटाके बनवणाऱ्यांनी साधारण 8-10 वर्षांपूर्वीच जमिनीवर आवाज न करता आकाशात जाऊन आवाज करायला सुरुवात केली.
आवाजविरहित फटाक्यांमध्ये प्रामुख्याने रंगांसोबत, कलाकृतीलाही महत्त्व दिले जात असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. लाल, पिवळा, निळा, हिरवा अशा रंगांची उधळण आपल्याला आकाशात पाहायला मिळते. रंगीत फटाक्यांसाठी प्रामुख्याने जे रासायनिक घटक वापरले जातात त्यात मॅग्नेशियम, सोडियम, क्षार, बेरियम, स्ट्राँशियम यांचा वापर केला जातो. अर्थात हे सर्व घटक मोठय़ा प्रमाणावर, मोठय़ा आकारात बंदिस्त केल्याने प्रचंड प्रमाणावर आवाज आणि वेगाची निर्मिती होऊन त्यातून विविध रंग उधळले जातात.
फटाक्यांमध्ये गच्च भरलेली दारू पेटवली असता निर्माण होणाऱ्या दाबामुळे आतील रासायनिक घटक गरम होऊन लांब फेकले जाऊन त्यातील स्फटिके पेट घेतात आणि आपल्याला ‘कलरफुल नजारा’ पाहायला मिळतो. मात्र या रंगामुळे वातावरणात सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनाक्साईड, अँटिमनी तसेच नायट्रोजनची विविध ऑक्साईडस् पसरली जातात. हे जरी खरे असले तरी या आवाजविरहित फटाक्यांना दिवसेंदिवस मागणी वाढतच आहे. मुंबईच्या महंमद अली रोडवरील इसाभाई यांची चार दुकाने आहेत. आजची ही त्यांची चौथी पिढी. येथील महंमद याने सांगितले की, यंदा कानठळय़ा बसवणाऱ्या फटाक्यांवरून ग्राहकांच्या उडय़ा म्युझिकल क्रॅकर्स आणि शॉटस् यांच्या मागणीवर पडत आहेत. त्यातही स्टॅण्डर्ड, बाबा, स्पार्कल्स, कॉक, व्होल्कॅनो, आझाद या ब्रॅण्डच्या आवाजविरहित फटाक्यांना जास्त मागणी आहे.
तामीळनाडू राज्यातील शिवकाशी येथून या सर्व ब्रॅण्डस्चे फटाके येतात. तिथे फटाक्यांची मोठय़ा प्रमाणावर निर्मिती होते. परिणामी तेथील वातावरण बाराही महिने कोरडे असते. हल्ली तर ‘चायना मेड’ फटाक्यांनी बाजार बऱ्यापैकी पकडून ठेवला आहे. यात आवाज कमी आणि प्रकाश जास्त असल्याने त्यांना मागणीही भरपूर आहे.
हेही लक्षात ठेवा
- फटाके फोडण्यापूर्वी त्यावर लिहिलेली माहिती जरूर वाचायला हवी.
- सहसा कमी आवाज येतील असेच फटाके फोडावेत. कारण त्यामुळे मुक्या जनावरांना त्रास होणार नाही.
- घराबाहेर जाऊन मोकळ्या जागेत फटाके फोडावे. म्हणजे घरातल्या वस्तूंना धोका पोहोचणार नाही.
- फटाके फोडताना आईबाबांनी मुलांसोबत राहायला हवे. मुले चुकीच्या पद्धतीने फटाके फोडत असतील तर त्यांना वेळीच आवर घातला पाहिजे.
- नकळत फटाक्यामुळे चटका बसला तर भाजलेला भाग किमान 20 मिनिटे पाण्यात धरून ठेवावा.
- फटाके फोडताना चप्पल घालायला विसरू नका.
- त्वरीत आग पकडतील अशा वस्तू फटाक्यांपासून जरा दूरच ठेवा.
- श्वास घेण्याचा त्रास असलेल्या व्यक्तींनी दिवाळीच्या दिवसांत रात्री घराबाहेर पडणे टाळावे.
- रहदारी असलेल्या रस्त्यावर फटाके फोडू नयेत. त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्यांना त्रास होतो.
आकर्षक नावांचा फायदा
गोल्डन विलो रॉकेट, रंगीत रॉकेट – डान्स और डान्स आणि पार्टी ऑल नाईट, फटाक्यांचे नृत्य – ग्रीन शॉवर, हिरव्या रंगाचा अनार, मनपसंद आणि आकर्षक पायली अवतार 50-50 ट्रॉय 25-25 (आवाज करणारा फटाका)































































