
सामना प्रतिनिधी । परभणी
सणांचा राजा दिवाळीस मोठ्या थाटात सुरुवात झाली असून आज बुधवारी लक्ष्मीपूजनाच्या कार्यक्रमासाठी व्यापाऱ्यांमध्ये मोठी धामधुम दिसून आली. सर्वत्र आनंदाचे वातावरण असून दीपावलीच्या साहित्य खरेदीसाठी शहरातील सर्वच बाजारपेठेमध्ये तौबा गर्दी झाली होती. सकाळपासूनच विविध प्रकारच्या फुलांच्या विक्री होत असताना फुलांची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने फुलांचे भाव अक्षरश: गडगडल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सुरु दिसून येत होता. सोशल मिडीयावर देखील फुलांचे भाव घसरवू नका यासाठी आवाहन देखील करण्यात आले होते.
दिवाळीच्या सणाची घराघरातून जय्यत तयारी दिसून येत आहे. बुधवारी लक्ष्मीपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या पूजेसाठी आवश्यक असलेली पाचफळे, खातेवह्या, लक्ष्मीचे फोटो, विविध आकाराच्या पणत्या आदींच्या दुकानांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी दिसून आल्याने बाजारपेठ फुलल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळाले. यंदाची दिवाळी ही फटकेमुक्त साजरी करावी, या आवाहनास ग्रामीण भागासोबतच शहरी भागातही मोठा प्रतिसाद मिळाला. लक्ष्मीपूजनासाठी घराघरातून नवीन पणत्या, लाह्या, बत्ताशे, फुले आदी खरेदी केली. फुलांची आवक मोठ्या प्रमाणात परभणी शहरात झाल्याने ५० रुपये प्रतिकिलोचा झेंडू फुलांचा भाव अक्षरश: गडगडला. केवळ १५ रुपये किलो दराने विक्री गांधीपार्क, वसमत रोड आदी भागामध्ये करण्यात आली. तसेच केळीचे खांब, ऊस आदी खरेदी देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आली. लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने लक्ष्मीची छोटी मूर्ती खरेदी करण्यात आली. बच्चे कंपनीं फटाके खरेदी करताना स्टॉलवर आढळली. लहान मुलांना फटाक्यांची आवड असल्याने पालकांसमावेत बालकांनी फटाके खरेदी केल्याची चित्र केवळ शहरीभागातच पहावसाय मिळाले. जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींनी यंदाची दिवाळी ही फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा ठरावच घेतला होता. यंदा वरुण राजाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांचे कापूस, सोयाबीन हे पीक हातचे गेल्याने मोंढ्या परिसरात दिवाळी उंबरठ्यावर आली असताना देखील शुकशुकाट दिसून आला.
दिवाळीच्या सणासाठी लेकीबाळींना घरी आणण्यात येत असते. रेल्वे आणि बसस्थानकावर मोठी गर्दी झाली असल्याचे चित्रही पहावयास मिळाले. एसटीनेही सणाच्या पार्श्वभूमीवर भाडेवाढ केली आहे. तसेच खाजगी वाहतुकदारांनी आपले प्रवासी भाडे आव्वाचे सव्वा केले असले तरी याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. आज लक्ष्मीपूजनाचा आणि दिवाळीचा आरंभ होत असल्याने एकमेकांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देणे तसेच सोशल मिडियावरुन देखील दिवाळीच्या शुभेच्छा पाठविण्यावर भर देण्यात आला आहे. फराळाचे तयार साहित्य खरेदी करण्यावर ग्राहकांनी भर दिला आहे. वस्तुंच्या खरेदीसाठी लहानमुलांनी आपल्या आईवडिलांसह बाजारपेठेत आल्याने बाजारपेठ फुलून गेल्याचे चित्र परभणीत सर्वत्र पहायवास मिळाले.
फटाके फोडण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने फटाके फोडण्याचा कालावधी रात्री ८ ते १० ठेवण्यात आला आहे. याची खबरदारी घेण्याचे आवाहन मनपाच्यावतीने करण्यात आले आहे. दिलेल्या वेळेतच नागरिकांनी फटाके फोडून सण साजरा करावा, असे आवाहनही केले आहे. दरम्यान, कापड, किराणा तसेच सराफी दुकानातही सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत तोबा गर्दी झाल्याचे दिसून आले.


























































