दिवाळीनिमित्त धनंजय मुंडे यांचे गुरूदास सेवा आश्रमात कपडे आणि फराळ वाटप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रतिनिधी । परळी वैजनाथ

यावर्षीची संपूर्ण दिवाळी शेतकरी, कष्टकरी, दुष्काळग्रस्तांच्या व्यथा जाणून घेवून त्यांच्या समवेत साजरी करत असलेल्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदुर येथे असलेल्या गुरूदास सेवा या वृध्दाश्रमात येथील वृध्द मंडळींसोबत दिवाळीचा सण साजरा केला. त्यांच्या सोबत दिवाळीचा फराळ घेतांना त्यांनाही नवीन कपडे तसेच हिवाळ्यासाठी लागणार्‍या गरम कपड्यांचे वाटपही करण्यात आले.

परळीपासून जवळच असलेल्या घाटनांदुर येथील गुरूदास सेवा आश्रमात अनेक वृध्द महिला, पुरूष, निराधार राहत आहेत. या आश्रमाचे पालकत्व धनंजय मुंडे यांनी स्वीकारले असून दिवाळी भाऊ बीजेचे औचित्य साधत त्यांनी आश्रमाला भेट देवून वृध्द मंडळीं समवेत दिवाळीचा फराळ केला. त्यांच्याशी आस्थेवाईकपणे चर्चा केली तसेच महिलांना साडी-चोळी, पुरूषांना धोती-कपडे, टॉवेल, हिवाळा असल्याने चादर असे गरम कपड्यांचे वाटपही त्यांच्या हस्ते करण्यात आले. परळीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्या तर्फे कै. पंडितअण्णा मुंडे यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या हायमास्ट दिव्यांचे लोकार्पणही यावेळी मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.

या वृध्दाश्रमात राहणार्‍यांना त्यांच्या पालकांनी एकटे सोडले असले तरी मी त्यांचे पालकत्व आता घेतले आहे. केवळ आश्रमाला आर्थिक मदत करणे, त्यांना दैनंदिन लागणार्‍या गोष्टी देणे यापेक्षाही त्यांना या वयात आवश्यक असणारी आपुलकी आणि मायेची चादर देण्याचे काम मी आयुष्यभर करीत राहणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

संपूर्ण दिवाळी पिडीतांसमवेत
धनंजय मुंडे यांनी यावर्षी आपली संपूर्ण दिवाळी शेतकरी, कष्टकरी आणि पिडीतांसमवेत घालवली. दुष्काळग्रस्त भागाची पाहणी, त्यांच्याशी चर्चा, पोलिसांच्या मारहाणीत जखमी झालेल्या ऊसतोड कुटुंबियांचे सांत्वन, पेन्शनर नागरिकांसोबत फराळ, व्यापार्‍यांच्या गाठी-भेटी आणि आज वृध्दाश्रमातील वृध्दांशी संवाद करीत त्यांनी आपला दिवाळी सण साजरा केला.