
सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी
पूर्वीच्या वादातून कसाल बालमवाडा येथील आदित्य अनंत सावंत याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी कसाल येथील राहुल प्रकाश डांगी याच्यासह तिघांवर ओरोस पोलिस ठाण्यात भादवी क़लम 324, 504 आणि 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्यात आदित्य हा जखमी झाला आहे.
कसाल बालमवाडा येथे राहणारा राहुल डांगी आणि फिर्यादी आदित्य सावंत यांच्यात वाद विवाद होते. याचा राग धरत गुरूवार 8 नोव्हेंबर रोजी सायंकाळी राहुल डांगी याने आपल्यासोबत असलेले मित्र साजिद फादर फकीर (29), सौरभ प्रदीप कडूलकर (22) आणि अन्य एक यांच्यासह धारदार हत्यारांसह सायंकाळी 5:15 वाजण्याच्या सुमारास आदित्य सावंत याचे घर गाठले आणि त्याला शिवीगाळ करत राहुल याने आपल्या हातातील चाकूने फिर्यादी आदित्य याच्या मानेवर वार केला. तर सोबत असलेल्या एकाने त्याला ठोशाने मारहाण केली. यात आदित्य याच्या मांडीवर आणि हातावर दुखापत झाली. चाकूच्या निसटत्या वाराने आदित्य याच्या मानेवर किरकोळ जखम झाली. अधिक तपास ओरोस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस व्ही पाटकर आणि हवालदार एस जी मणचेकर हे करत आहेत.





























































