
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली सध्या सुरु असलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळत नाही. त्याने विश्रांती घेणे पसंत केले आहे. तरीही आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटी आणि वनडे रँकिंगमध्ये विराटच अव्वल स्थानावर आहे. कसोटीत 935 गुणांकासह तो टॉपच्या जागेवर असून 910 गुणांसह ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ दुसऱ्या स्थानी आहे.
कसोटीप्रमाणे वनडे क्रिकेटमध्येही कर्णधार विराट कोहलीने आपल्या धडाकेबाज फलंदाजीने आयसीसी फलंदाजी रँकिंगमध्ये 899 गुणांसह नंबर एकचे स्थान स्वतःकडे अबाधित राखले आहे. त्याच्यापाठोपाठ टीम इंडियाचा “हिटमॅन” रोहित शर्मा 871 गुणांकासह दुसऱ्यास्थानी आहे. वनडे गोलंदाजांच्या हिंदुस्थानचा जसप्रीत बुमराह 841 गुणांसह टॉपवर आहे.तर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अफगाणिस्तानच्या रशीद खानने 353 गुणांसह टॉपचे स्थान स्वतःकडे ठेवले आहे.
विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दमदार फलंदाजी केली होती. त्यामुळे त्याला आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये आपले नंबर वन स्थान अबाधित राखता आले आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन गोलंदाजांच्या यादीत 896 गुणांकासह अव्वल स्थानावर असून बांगलादेशचा शकिब उल हसन अष्टपैलू कसोटीपटूत 411 गुणांकासह टॉपवर आहे. त्याच्या पाठोपाठ हिंदुस्थानचा रवींद्र जाडेजा 400 गुणांकासह दुसऱ्या स्थानी आहे.




























































