दिवाळीत बंद झालेले भारनियमन पुन्हा सुरू होणार नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

राज्यात दिवाळीत बंद झालेले भारनियमन आता दिवाळीनंतर पुन्हा सुरू होणार नाही अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. राज्यातील विजेची मागणी कमी झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले. राज्याच्या वीजपुरवठय़ासाठी असलेल्या कोळशाचे योग्य नियोजन केले आहे. शिवाय सध्या थंडीच्या दिवसांमुळे विजेची मागणी कमी आहे. त्यामुळे दिवाळीनंतरही भारनियमन होणार नसल्याचे बावनकुळे यांनी पत्रकारांना सांगितले.

सध्या राज्यातील विजेची मागणी कमी झाली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांत विजेची मागणी 24 हजार मेगावॅटच्या पुढे गेली होती. ऑक्टोबर हीटमुळे राज्यात विजेची मागणी वाढली होती. वाढलेल्या मागणीनुसार पुरवठा करणे त्यावेळी शक्य नव्हते म्हणून लोडशेडिंग सुरू करण्यात आले होते असे बावनकुळे म्हणाले. मात्र तशी परिस्थिती सध्या राज्यात नाही. विजेची मागणी कमी झाली असून ती 20 हजार मेगावॅटवर आली आहे. येत्या काळात विजेची कमतरता भासू नये यासाठी 25 हजार मेगावॅटपर्यंतचे नियोजन करण्यात आले आहे. कोळशाचा मुबलक साठा सध्या राज्यात उपलब्ध आहे. त्याचा फायदा वीजनिर्मितीसाठी होईल, असे बावनकुळेंनी सांगितले.

राज्यातील शेतकऱयांची 32 हजार कोटींहून अधिकची वीजबिल थकबाकी आहे. सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे, शेतकरी संकटात आहे, मात्र तरीही शक्य झाल्यास किमान वीजबिल भरून शेतकऱयांनी सरकारला मदत करावी, असे आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केले.

summary- load shading will be not continue post diwali says chandrashekhar bawankule