
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
नक्षलवाद्यांशी दोन हात करण्यासाठी जवान चक्क आदिवासी भाषेचे धडे गिरवत आहेत. नक्षलवाद्यांनी स्थानिकांवर दबाव आणल्याने सुरक्षा दलाला नक्षलवाद्यांचा शोध घेणे कठिण झाले आहे. त्यातच या भागातील आदिवासींना स्थानिक भाषेव्यतिरिक्त दुसरी कुठलीही भाषा येत नसल्याने त्यांच्याशी संवाद साधताना जवानांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे जवानांना आदिवासी भाषेबरोबरच त्यांच्या संस्कृतीची ओळख व्हावी यासाठी आदिवासी भाषा शिकवली जात आहे. याला कॅप्सूल कोर्स असे नाव देण्यात आले आहे.
नक्षलवाद्यांविरोधात सीआरपीएफने शोध मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत झारखंडमध्ये 20 बटालियन तैनात करण्यात आल्या असून त्यात 20,000 जवानांचा समावेश आहे. या जवानांना रोजच स्थानिकांबरोबर संवाद साधावा लागत आहे. पण जवानांना येथील स्थानिक भाषाच येत नसल्याने त्यांच्या सूचना येथील आदिवासींपर्यंत पोहोचतच नाहीत. तसेच सरकारच्या अनेक योजनांबद्दल आदिवासींना माहिती देण्यासाठीही स्थानिक भाषेचा उपयोग जवानांना होईल, असे येथील सीआरपीएफचे प्रमुख संजय लठकार यांनी सांगितले आहे. येथे जवानांना प्रामुख्याने सुदूर या आदिवासी क्षेत्रात तैनात केले जाते. पण भाषेमुळे जवानांना अडचणी येत आहेत. यातून मार्ग काढण्यासाठीच जवानांना आदिवासी भाषा शिकणे गरजेचे असल्याचेही लठकार यांनी म्हटले आहे. प्रत्येक बटालियनमधील 60 जवानांना आदिवासी भाषा शिकवली जात आहे. हे जवान आदिवासींच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. जेणेकरून स्थानिक व नक्षलवाद्यांमधील लागेबांधे समजणे जवानांना सोपे जाणार आहे.
दरम्यान, आदिवासी भाषेबरोबरच नागपुरी, कुरुख, सदरी, भोजपुरी, संथाली अशा इतर भाषाही जवानांना शिकवल्या जाणार आहेत.























































