
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
दिल्लीचे वायूप्रदूषण आणि विषारी हवेने आता दिल्लीकरांसह येथे जागतिक मुष्टीयुध्द अजिंक्यपद स्पर्धेसाठी आलेल्या महिला बॉक्सरनाही धडकी भरली आहे. अशा दम घोटणाऱ्या दूषित वातावरणात हिंदुस्थानींचा प्रेमळ पाहुणचाराने मात्र त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दिल्लीतील वायू प्रदूषणाच्या बातम्या नव्या नाहीत. त्यामुळे या वायू प्रदूषणाशी दोन हात करण्यासाठी काहींनी अनेक पर्यायही अंमलात आणायचे ठरवले आहे.
दिल्ली आणि एनसीआर विभाग तसेच पंजाब आणि हरयाणा परिसरातही वायू प्रदूषणाचा मोठा परिणाम दिसत आहे. दिवाळी सणादरम्यान फटके फोडण्यावर निर्बंध घालण्याच्या न्यायालयाच्या आदेशाकडे कानाडोळा केला गेला, ज्यामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. फटाक्यांच्या धुराने दिल्लीच्या वायू प्रदूषणात अधिकच भर टाकली आहे.
‘आम्हा खेळाडूंनाच काय; पण असे वातावरण कोणालाही योग्य नाही. येथील हवा सूमारच आहे. दिल्लीत कुठेही जा, तुम्हाला असेच वातावरण पाहायला मिळणार आहे. आम्हाला तर श्वासोच्छावासासही अडथळा जाणवत आहे. अशा हवेत सराव करणेही जड जाते आहे’, असे बल्गेरियाची जगज्जेती मुष्टियोद्धी स्टॅनिमिरा पेत्रोव्हा म्हणाली. 2014 मध्ये बल्गेरियात पार पडलेल्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये तिने 57 किलो गटाचे जगज्जेतेपद पटकावले होते. रविवारी पत्रकारांशी संवाद साधताना तिने दिल्लीच्या दूषित हवेचा मुद्दा आवर्जून उपस्थित केला. स्टॅनिमिराची री ओढत युरोपियन चॅंम्पियनशिपमधील ब्राँझपदक पटकावणारी जर्मनीची अझिझी निमानी म्हणाली, मी टीका करत नाही. पण गमतीने म्हणते ‘वायू प्रदूषण कमी असते, तर दिल्लीत वावरताना अधिक चांगले वाटले असते; पण येथील पाहुणचाराने भारावून गेले आहे. इथल्या लोकांनी माझे मन जिंकले आहे’. अझिझीची ओळख हिंदुस्थानी क्रीडाशौकिनांना असायलाच हवी; कारण तिनेच 2016 च्या ऑलिम्पिक प्राथमिक श्रेणीच्या स्पर्धेत 51 किलो वजनी गटात हिंदुस्थानच्या मेरी कोमवर मात केली होती. तो विजय आपल्या कारकिर्दीला नवे वळण देणारा ठरला, असे ती सांगते.
अझिझीनेही श्वासोच्छावासाचा थोडाबहुत त्रास होत असल्याचे मान्य करताना, त्याच्याशी जुळवून घेता येऊ शकेल, असे म्हटले आहे. वातावरणाशी जुळवून घेण्यासाठीच तिने हिंदुस्थानात लवकर येणे पसंत केले. ‘मी मान्य करते की, दिल्लीत श्वास घ्यायला त्रास होतो आहे. याची कल्पना असल्यानेच मी इथे लवकर आले आहे. जेणे करून येथील परिस्थिती आणि वातावरणाशी मला जुळवून घेता येईल. जवळपास आठवडाभर आधीच मी दिल्लीत आले आहे. त्यामुळे स्पर्धेदरम्यान मला खूप त्रास जाणवणार नाही’, असे अझिझी म्हणाली.






























































