मालवणचे क्रिकेटपटू निलेश केळुसकर यांचा अपघाती मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मालवण

मालवणचे क्रिकेटपटू निलेश केळुसकर (50) यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. केळुसकर रविवारी रात्री मालवण-देवगड मार्गावरील कोळंब भटवाडी येथे दुचाकीवरून जात होते. त्याचवेळी रस्त्यात बसलेल्या म्हशीची त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात केळुसकर रस्त्यावर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दांडी येथे राहणारे निलेश केळुसकर हे रविवारी रात्री कोळंब येथे मित्रांसमवेत पार्टीला गेले होते. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास निलेश हे आपल्या बजाज प्लॅटिनम दुचाकीवरून (क्रमांक- एमएच 01- एझेड 7318) मालवणच्या दिशेने ओरोसला जाण्यास निघाले होते. ओझर तिठ्यावरून काही अंतरावर कोळंब भटवाडी येथे निलेश हे पोहचले असता रस्त्यात आडव्या आलेल्या तीन म्हैशींपैकी एका म्हशीला निलेश यांच्या दुचाकीची जोरदार धडक बसली. हा अपघात सागर यल्लप्पा चौगुले (वय ३३, रा. कोळंब भटवाडी) यांनी पाहिला. या धडकेत निलेश हे रस्त्यावर फेकले जाऊन डोके आपटल्याने डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत झाल्याने त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या. सागर यल्लप्पा यांनी घटनास्थळी धाव घेऊन निलेश यांना रस्त्यावरून बाजूला केले. अपघाताचे वृत्त कळताच घटनस्थळी दाखल झालेल्या निलेश यांच्या मित्रांनी व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी निलेश यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. दरम्यान तत्पूर्वी १०८ रुग्णवाहिकेशी संपर्क होऊ न शकल्याने निलेश यांच्या मित्र परिवाराने नाराजी व्यक्त केली.

मालवणात दांडगा लोकपसंपर्क असणाऱ्या निलेश यांच्या अपघाती निधनाचे वृत्त रात्री मालवणात वाऱ्यासारखे पसरले. हे वृत्त कळताच निलेश यांच्या मित्रपरिवाराने मालवण ग्रामीण रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती. सर्वांच्या चेह-यावर दुखः आणि डोळ्यात अश्रू होते. निलेशचा अकाली मृत्यू होईल यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. ग्रामीण रूग्णालयात शवपेटीमध्ये ठेवण्यात आलेला मृतदेह पाहून अनेकांचे डोळे पाणावले होते. रूग्णालय परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती. निलेश यांच्या अपघाताची महिती मिळताच शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, उमेश नेरूरकर, नगरसेवक दिपक पाटकर, नगरसेवक यतीन खोत, नगरसेवक पंकज सादये, माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर, आस्था ग्रुपचे अध्यक्ष उमेश मांजरेकर, गणेश कुशे, आप्पा लुडबे, मेघनाद धुरी यांच्यासह व्हीएमसी क्रिकेट संघाचे अनेक खेळाडू अणि युवकांनी ग्रामीण रूग्णालयात गर्दी केली होती.

निलेश यांच्या अपघाती अकाली जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, दोन मुली, दोन भाऊ, चार बहिणी असा परिवार आहे. मनिषा साऊंड सर्व्हीसचे मालक आबा केळुसकर यांचा तो मुलगा होत.