अनिल गोटेंची भाजप मंत्र्यांवर बेफाम टीका, जयकुमार रावलना म्हणाले चिकना फद्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, धुळे

धुळे महापालिका निवडणुकीत सत्ता काबीज करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या भाजपच्या नेत्यांचा संघर्ष विरोधकांशी कमी आणि आपापसातच जास्त सुरू झाला आहे. धुळे महापालिका निवडणुकीची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर सोपवली आहे. यामुळे भाजपचे आमदार अनिल गोटे भयंकर संतापले असून ते जिथे संधी मिळेल तिथून या नेत्यांवर टीका करीत आहेत. गोटे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांशी बोलताना गिरीश महाजन, जयकुमार रावल यांच्यावर जळजळीत टीका केली आहे. या भाषणामध्ये त्यांनी रावल यांचा उल्लेख चिकना फद्या असा केल्यानं धुळ्यामध्ये सध्या त्याचीच जास्ती चर्चा आहे. गोटे काय म्हणाले ते ऐका

भाजपने नुकत्याच आयोजित केलेल्या विजय संकल्प मेळाव्यात गोटे यांना डावलण्यात आले होते. त्यांना या सभेचे निमंत्रणही नव्हते आणि फलकावर त्यांचे फोटोही नव्हते. यामुळे भडकलेल्या गोटे सभेच्या ठिकाणी येत संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासमोरच जबरदस्ती भाषण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी जबरदस्त गोंधळ उडाला होता. अखेर गोटे यांना तिथून पोलीस बंदोबस्तात बाहेर काढण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलत असताना गोटे यांनी भाजपच्या नेत्यांवर आणि मंत्र्यांवर टीका केली होती. या टीकेमुळे दानवे यांनी स्वपक्षाच्या मंत्र्यांवर टीका करणाऱ्या आमदाराला कारवाईला सामोरे जावे लागेल, असे सांगितले होते. कोणाची दादागिरी भाजप खपवून घेणार नाही. पुढील निवडणुकीत धुळ्यात भाजपचाच आमदार होईल, असे म्हणत गोटेंना आणकीनच डिवचण्यात आलं होतं.