
सामना प्रतिनिधी । चंदीगड
१९७१ च्या हिंदुस्थान -पाकिस्तान युद्धातील “बॅटल ऑफ लोंगेवाला” च्या विजयाचे शिल्पकार निवृत्त ब्रिगेडियर कुलदीप सिंग चंदपुरी यांचं आज निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. महावीरचक्राने सन्मानित करण्यात आलेल्या कुलदीप सिंग यांना मोहाली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
आज सकाळी ८.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. गेली अनेक वर्षे ते कर्करोगाशी झुंज देत होते.त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुलगे असा परिवार आहे. कुलदीप सिंग यांचा दुसरा मुलगा जर्मनीहून परतल्यानंतर कुलदीपसिंग यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती हरदीप सिंग चंदपुरी यांनी दिली आहे. देशाने आज कुलदीपसिंग यांच्या निधनाने एक निधड्या छातीचा सैनिक आणि देशाचा महान सुपुत्र गमावला आहे अशा शब्दांत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी ब्रिगेडियर चंदपुरी यांना श्रद्धांजली वाहिली.
“लोंगेवाला बॅटल”वर काढण्यात आला होता “बॉर्डर” चित्रपट
१९७१ च्या युद्धात राजस्थान येथील लोंगेवाला सीमेवर पाकिस्तानकडून ५ आणि ६ डिसेंबरच्या मध्यरात्री हल्ला चढविण्यात आला होता. यावेळी पंजाब रेजिमेंटच्या तुकडीचे नेतृत्व कुलदीप सिंग यांनी केलं होतं. राजस्थान सीमेवर पाकिस्तानी फौजांशी लढताना आवश्यक कुमक येईपर्यंत आपल्या सहकाऱ्यांसह एका बंकरमधून दुसऱ्या बंकरमध्ये जात मेजर पदावर असणाऱ्या कुलदीपसिंग यांनी पाकिस्तानी सैन्याला गुंगारा देऊन गनिमी काव्याने शत्रूवर विजय मिळवला. “लोंगेवाला बॅटल” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युद्धात हिंदुस्थानच्या विजयाचे ते शिल्पकार ठरले. चित्रपट निर्माते जे. पी. दत्ता यांनी कुलदीप यांच्या या पराक्रमी अभियानावर आधारित ‘बॉर्डर’ चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटात सनी देओल याने कुलदीप सिंग यांची भूमिका साकारली होती.



























































