
सामना प्रतिनिधी । बुलढाणा
शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सोमवारी एक दिवसीय बुलढाणा व अकोला जिल्हा दौर्यावर येत असून या दौर्यात ते या दोन्ही जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबाना मदतीचा हात देणार आहेत.
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे सोमवारी सकाळी ८ वाजता संभाजीनगर विमानतळावर आगमन होऊन ते सिंदखेडराजाकडे कारने प्रयाण करणार आहे. सकाळी १० वाजता सिंदखेडराजा येथे ते माँ जिजाऊ जन्मस्थळाचे दर्शन घेणार आहे. त्यानंतर राजवाड्याची पाहणी करुन ते मेहकरला रवाना होणार असून मेहकर येथे ११ वाजता नगरपरिषदेच्या स्वातंत्र्य मैदानावर जिल्ह्यातील २५० आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबाना मदतीचे वाटप करुन उपस्थितांशी संवाद साधणार आहे.
त्यानंतर दुपारी १ वाजता ते अकोला कडे रवाना होणार असून दुपारी ३ वाजता अकोला येथे पोहोचून पंजाबराव कृषी विद्यापीठ येथे अकोला जिल्ह्यातील १५० आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबाना मदतीचे वाटप करणार आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा बुलढाणा व अकोला जिल्हा दौरा यशस्वी करण्यासाठी शिवसेना, युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेत आहे.






























































