
सामना प्रतिनिधी । मुंबई
दिंडोशीतील प्रतिपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे कार्तिकी एकादशीनिमित्त आयोजित पालखी सोहळ्यात ‘ग्यानबा-तुकाराम’चा गजर घुमला. क्रांतिनगर येथील नॅशनल चाळ येथे पार पडलेल्या या सोहळ्यात शेकडो वारकरी, भाविक टाळ-मृदुंगाच्या साथीने भजनात तल्लीन झाले.
गेल्या अनेक वर्षांपासून या माऊलींच्या पालखी सोहळ्याचा प्रथम भोई होण्याचा मान स्थानिक विभागप्रमुख-आमदार सुनील प्रभू यांना दिला जातो. या वर्षीदेखील आमदार प्रभू शिवसेना नगरसेवक, पदाधिकारी-कार्यकर्त्यांसह माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले. दिंडोशीतील वारकरी संप्रदाय हा भागवताच्या भगव्यासोबत ‘ग्यानबा तुकाराम’चा गजर करीत विठ्ठलाशी एकनिष्ठ आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याच विठुरायाचे पाईक आणि वारकऱ्यांच्या गळ्यातील ताईत आहेत, असे विठ्ठल-रुक्मिणी मित्र मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग परब यावेळी म्हणाले. यावेळी नगरसेविका विनया सावंत, विष्णू सावंत, रमेश कळंबे, विजय गावडे, योगीता धुरी, शरद केदारे, विजय शिर्के, अनिल उपाध्याय, मारुती कळंबे, देवेंद्र वाघ, प्रकाश मेहरा व मंडळाचे पांडुरंग परब, संभाजी साळेकर, संजय जाधव, भरत धुरी, प्रकाश जाधव, मंगेश वाघे, किशोर सोनकांबळे आदी उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
कार्तिकी एकादशीनिमित्त मंदिरात काकड आरती, अभिषेक, हरिपाठ सोहळा, सांस्कृतिक बालनृत्य, भजन असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. कृष्णाई सेवा भजन मंडळाच्या सहकार्याने आयोजित माऊलींच्या पालखीच्या नयनरम्य मिरवणूक सोहळ्यात शेकडोंच्या संख्येने भाविक सहभागी होतात.

























































