
सामना ऑनलाईन, मुंबई
पालिका मुख्यालयात सुरक्षेसाठी महिलांना जाणीवपूर्वक नाइट डय़ुटी लावणाऱ्या प्रशासनाला शिवसेनेने आज चांगलेच झापले. या महिलांना रात्री उशिरा डय़ुटी संपवून घरी जाताना गैरसोयीचे ठरते. शिवाय पालिका मुख्यालय परिसरात रात्री उशिरा गर्दुल्ले आणि समाजकंटकांचा वावर वाढत असल्यामुळे दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, असा सवाल स्थायी समितीत करण्यात आला.
पालिका मुख्यालयातील सुरक्षेसाठी डय़ुटी लावताना महिला सुरक्षा रक्षकांना जाणीवपूर्वक नाइट डय़ुटी लावली जात असल्याचे सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी निदर्शनास आणून दिले. यामुळे संबंधित महिलांची होणारी गैरसोय संबंधित सुरक्षा अधिकाऱ्यांच्या वारंवार निदर्शनास आणूनदेखील दुर्लक्ष केले जात असल्याचे त्या म्हणाल्या. यामध्ये आजारी महिलांनाही जाणीवपूर्वक नाइट डय़ुटी लावली जात असल्याचे त्या म्हणाल्या. तर सुरक्षा अधिकाऱ्यांची मनमानीकडे पालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी केला. अनेक तक्रारी असलेले सुरक्षा अधिकारी चौबळ यांच्याबद्दलच्या चौकशीचा अहवाल स्थायी समितीने मागणी करूनही सहा महिने झाले तरी सादर केला नसल्याचे निदर्शनास आणून दिले.
…तर एकही प्रस्ताव मंजूर करणार नाही
मनमानी करणारे अधिकारी चौबळ यांच्या चौकशीचा अहवाल सहा महिन्यांनीदेखील स्थायी समितीला देण्यास टाळाटाळ करणाऱ्या प्रशासनाचा स्थायी समितीच्या सर्वपक्षीय सदस्यांनी निषेध केला. जोपर्यंत प्रशासन हा अहवाल देत नाही तोपर्यंत सुरक्षा खात्याचा एकही प्रस्ताव मंजूर करणार नाही, असा इशाराच स्थायी समितीने देत आज आलेला ‘पद सातत्याचा’ प्रस्ताव रोखून ठेवला. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी चौबळ यांच्या चौकशीचा अहवाल पुढील बैठकीत सादर करा असे निर्देश प्रशासनाला दिले.





























































