
सामना ऑनलाईन, पुणे
नोकरी सोडून गेलेले कामगारांच्या पगाराची खोटी बिले काढण्यात आली. त्याद्वारे १० लाख ८८ हजार रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
संदीप नागुरे (वय ३८, रा. बिजलीनगर, चिंचवड) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. सातारा रस्त्यावर आयएसजी हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड ही कंपनी आहे. या कंपनीकडून विविध ठिकाणी कामगार पुरविले जातात. २०१४ ते २०१५ या कालावधीत शिंदेवाडी आणि शिरवळ शाखेमध्ये एरिया इन्चार्ज म्हणून काम करणाऱ्या दोघांना कंपनीमध्ये कामगारभरती करणे, हजेरी घेणे, त्यांचे पगार काढणे असे काम त्यांना दिले होते. या दोघांनी कंपनीतून काम सोडून गेलेल्या कर्मचाऱ्यांची खोटी हजेरी तयार केली, त्यावरून त्यांच्या पगारासाठी १० लाख ८८ हजार रुपये घेतले. हा फसवणुकीचा प्रकार समोर आल्यानंतर दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक निरीक्षक एस. एन. शेख करत आहेत.





























































