
माणसाने अंतराळवारी केल्याची एकसष्टी पूर्ण होत असताना अनेकानेक अंतराळ कार्यक्रमांची रेलचेल सुरू झाली आहे. अंतराळात फेरफटका मारण्याच्या पर्यटनापासून ते चंद्र-मंगळावरच्या वसाहतीपर्यंतची स्वप्नं इलॉन मस्कसारख्या महत्त्वाकांक्षी व्यक्तींना खुणावतायत. विज्ञानाच्या मदतीने आता हे सारे दृष्टिपथात आले आहे. मुंबई-पुणे ‘हायपरलूप’ प्रवासाची चर्चा चालतेय आणि हा प्रवास केवळ 20 मिनिटांचा होण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्या ‘हायपरलूप’ तंत्रज्ञानाची मूळ कल्पना या इलॉन मस्क यांचीच.
त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन आता अनेकांच्या कल्पनेच्या अक्षरशः भराऱ्या सत्यात उतरू पाहतायत. चंद्र-मंगळावरचं विरळ वातावरण लक्षात घेता तिथे जाता येईल तेव्हा येईल, पण अंतराळात फिरून यायला काय हरकत आहे? तेसुद्धा केवळ अंतराळयात्री जातात तसे वैज्ञानिक प्रयोग वगैरे करण्यासाठी नव्हे तर मौजमजेसाठी जाणं जमलं तरच सर्वसामान्य माणसाला त्यात रस वाटणार. सध्या जगावर विविध प्रकारच्या प्रभावी ‘मार्केटिंग’चा कमालीचा पगडा आहे. नित्यनवीन कल्पना कशा विकायच्या याची स्पर्धाच सर्वत्र दिसते. पृथ्वीवरची पर्यटनस्थळे आता विशेष राहिलेली नाहीत. म्हणजे मनात आणले (आणि खिशात पैसे असले) तर तिथे कोणीही, केव्हाही जाऊ शकते, परंतु अंतराळात जायची कितीही इच्छा असली तरी तिथे सहजतेने जाणे सोपे नाही. त्यासाठी किमान शारीरिक क्षमताही असावी लागते. अर्थात तशीच ती हिमालयातल्या अत्युच्च शिखरांवर जातानाही लागतेच.
मात्र उत्तम प्रकृतीच्या लोकांना यापुढे कदाचित पर्यटनासाठीचे हॉटेल बुक करायचे झाले तर ते थेट अंतराळातले करता येईल. यासंदर्भातला केवळ विचारच नव्हे तर आचारही प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने ‘ओरायन स्पॅन’ या कंपनीने ‘अरोरा स्टेशन’ नावाचे आलिशान अंतराळी हॉटेल 2021 पर्यंत अवकाशात सोडायचे ठरवलेय. म्हणजे अंतराळातील चैनीच्या प्रवासासाठी बेचैन झालेल्यांसाठी ही मोठी खूशखबर आहे.
हे ‘अरोरा स्टेशन’ पृथ्वीपासून 320 किलोमीटर अंतरावरून अवकाशात घिरटय़ा घालेल. यामध्ये पर्यटकांसाठी सर्व सोयीसुविधा असतील. पृथ्वीपासून इतक्या कमी अंतरावरून फिरणाऱ्या कृत्रिम उपग्रहांची साधारण नव्वद मिनिटांत पृथ्वीभोवती परिक्रमा होते. याचा अर्थ या अंतराळायानात पंचेचाळीस मिनिटांची ‘रात्र’ आणि पंचेचाळीस मिनिटांचा ‘दिवस’ अनुभवता येतो. ‘ओरायन स्पॅन’चे जनक फ्रँक बन्गर यांचे म्हणणे असे की, ‘माणसाने अंतराळानुभव घ्यायला हवा. कारण आपल्या पर्यटन मर्यादेची ती परिसीमा आहे. आम्ही केवळ पर्यटनानुभव नाही तर अंतराळयात्री होण्याची अनुभूती जनसामान्यांना देऊ इच्छितो.’ इच्छा तर चांगली आहे. त्यामुळे ‘इच्छा तशी फळं’ या न्यायाने या अमेरिकेतील हय़ुस्टनस्थित ओरायन स्पॅन कंपनीला चांगलेच यश मिळेल यात शंका नाही. ‘‘आम्हालाही अंतराळात जायचंय!’ म्हणणाऱ्यांची रांग एव्हाना लागलीही असेल. अंतराळात जायचं या कल्पनेने मनाला लागलेली हूरहूर, खर्चाचा अंदाज आल्यानंतर परवडली तरच प्रत्यक्षात उतरणार. पहिली गोष्ट ‘फिजिकल फिटनेस’ म्हणजे अंतराळातील वास्तव्यात टिकणारी प्रकृती असायला हवी. मोठे किंवा त्रासदायक आजार असून चालणार नाही. या शारीरिक चाचणीत ‘पास’ झाले की, मग खिशाची चाचपणी! 12 दिवसांच्या या अंतराळी हॉटेलातल्या चैनीसाठी (फक्त) 95 लाख डॉलरचा खर्च अपेक्षित आहे. डॉलर आणि रुपयाचा विनिमयाचा किमान दर 70 रुपये प्रतिडॉलर धरला तरी एकूण खर्च साठ-पासष्ट कोटींच्या घरात जाईल. बारा पंचे साठ म्हणजे दिवसाचे कमीत कमी पाच कोटी रुपये खर्चायची तयारी हवी. अर्थात असे धनाढय़ आपल्याकडेही आहेत. त्यांना हा प्रवास (खिशाला) नक्कीच झेपेल. फक्त शारीरिकदृष्टय़ा ही झेप किती झेपते हा महत्त्वाचा मुद्दा.
… आणि सारे कसे छान छान जुळून आले तर चार प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या दोन चालकांसह सहा जणांना अंतराळ सफरीचा आस्वाद घेता येईल. चौतीस गुणिले चौदा फुटांच्या ‘अरोरा स्टेशन’मध्ये आवश्यक त्या सुखसोयी असतील. ही कंपनी त्यासाठी संभाव्य प्रवाशांकडून आधी 80 हजार डॉलर अनामत रक्कम घेणार आहे. प्रवास न केल्यास ती परत मिळेल. थोडक्यात काय, 12 दिवसांत 384 ‘सूर्योदय’ पाहण्याची संधी साधायची असेल तर अंतराळ हॉटेलात मुक्काम करायला हवा. पहा, जमतंय का!




























































