
सामना प्रतिनिधी । सटाणा
बागलाण तालुक्यातील येथे पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणलेल्या बनावट विदेशी मद्यसाठ्यासह एकास मोठय़ा शिताफीने अटक करण्यात आली तर दोन जण फरार झाले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून 37 हजार 200 रुपये किमतीच्या 110 बनावट मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.
विंचूर-प्रकाशा महामार्गावरील करंजाड येथील बस स्थानकाजवळ आरोपी आपल्या दोन साथीदारांसह बनावट विदेशी दारू विक्रीसाठी घेऊन आल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांना मिळाली होती. त्या आधारे गुरव यांनी पोलीस कर्मचारी गोरख गर्दे, निकेश कोळी, राजेश साळवे, जी. एल. भोये, दिलीप गवळी, भालचंद्र नेरकर आदींच्या पथकासमवेत सापळा रचून मुख्य आरोपी सागर विष्णू बोडके (रा. इंदिरानगर ता. त्र्यंबकेश्वर) यास मुद्देमालासह अटक केली.
आरोपींकडून अँटीक्युटिक नावाच्या 37 हजार 200 रुपये किमतीच्या लहान, मोठय़ा आकाराच्या 110 बनावट मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान पोलीस आल्याची कुजबुज लागताच दोन आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणी जायखेडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जी. एल. भोये व दिलीप गवळी करीत आहेत.





























































